फुलचंद रोकडे यांचा वारकरी सेवा संघातर्फे सत्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : साधारणत: लोकांच्या रस्त्याच्या दुरावस्थे बद्दल तसेच झालेल्या कामा बद्दल कायम तक्रारी असतात. मात्र एखाद्या रस्त्याचे काम ठेकेदाराने चांगले केले तर लोक त्या कामाबद्दल कौतूक देखील  करायला विसरत नाहीत असा अनुभव नुकताच आला आहे. शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेचे सचिव तथा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर फुलचंद रोकडे यांनी शेवगाव – वरुर या ५ कि.मी.अंतराच्या रस्त्याचे केलेले डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याने त्यांचा श्रीक्षेत्र वरुर येथील वारकरी सेवा संघातर्फे मुकुंद महाराज अंचवले यांच्या हस्ते श्रीविठ्ठल – रुक्मिणी प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

‘ धाकटी पंढरी ‘ श्रीक्षेत्र वरुर येथे श्री विठ्ठलाचे साडेचारशे वर्षाचे पुरातन मंदिर असून तेथील वालुकामय मूर्ती स्वयंभू आहेत. या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आ.मोनिका राजळे यांनी  निधी उपलब्ध करून दिला असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता के.बी.दंडगव्हाळ, शेवगावचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, शाखा अभियंता रामेश्वर राठोड तसेच निवृत्त कर्मचारी सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडे यांनी या रस्त्याचे काम  मुदतीत व दर्जेदार केल्याने त्यांचा वारकरी सेवा संघाच्या वतीने अंचवले महाराज  यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानीत  करण्यात आले.

या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, व्हाईट थरमप्लास्ट, डेलीनेटर, रेड कॅट आइजचे काम केल्याने रस्त्याचे रुपडे आणखीनच खुलले आहे. तसेच आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रस्त्याच्या दुतर्फा ‘ पाऊले चालती पंढरीची वाट ‘ या शीर्षकाचे फलक लावून त्यावर संत शिरोमणी तुकोबारायांची अभंगवाणी चितारली आहे.