महाप्रसादात ५० क्विंटल मसालेभात व बुंदीचे वाटप
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त फुलला भक्तीचा मळा, महाप्रसादात ५० क्विंटल मसालेभात व बुंदीचे वाटप…..
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २१ : गुरु प्रत्येकाच्या जीवनात सन्मार्ग दाखवून संकटात मदत करतात असे प्रतिपादन संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी केले. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पर्वावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट भागात भाविक भक्तांच्या गर्दीने भक्तीचा मळा फुलला होता. भाविकांना महाप्रसादात ५० क्विंटल मसाले भात व बुंदीचे वाटप करण्यात आले.
मंदिरावर पहाटे चार वाजता बाबाजींची महापुजा, ५ ते ६ नित्यनियम विधी, सकाळी ७ ते ८ सत्संग व प्रवचन, बाबाजींची षोडशोपचार पुजा ९ ते १०, विविध साधु संतांची प्रवचने झाली,या संपुर्ण कार्यकमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे (त्रंबकेश्वर), अनंत लावर गुरूजी राहाता, जयप्रकाश पांडे (महादेव मंदिर पुजारी बेट कोपरगांव) यांनी केले.
मठाधिपती स्वामी रमेश गिरी महाराज, श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज,भोलेगिरी, शिवभक्त भाउ पाटील, यांच्यासह आश्रमाच्यावतींने अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्थ त्रंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदिप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे यांनी भाविक भक्तांचे स्वागत केले.
या कार्यक्रम प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, संजीवनी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, अमृत शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,माधवराव पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुनील चव्हाण, मनोहर शिंदे, यादवराव कोते यांचे सह भावीक भक्त, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर मनमाड महामार्गावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम असुन देश विदेशातील भक्त येथे भेट देवुन दर्शन घेतात. पंचधातुपासून बनवलेल्या जनार्दन स्वामींच्या मूर्तीस व समाधीस्थानास फुलांची नयन मनोहर सजावट करण्यात आली होती.गुरुपौर्णिमा उत्सवाची महिनाभरापासून तयारी सुरू होती, मंदिर कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यांत आली होती.
हिंदू परंपरेत गुरु किंवा शिक्षक यांची नेहमीच ईश्वराशी तुलना केली जाते. व्यास पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणारा गुरु पौर्णिमा हा जणू एक सणच आहे. आपल्या गुरूंचा आदर आणि आभार मानण्याचा हा दिवस आहे. अज्ञानापासून मुक्ती देण्याचा मार्ग गुरु दाखवतात असे स्वामी रमेश गिरी यांनी आपल्या प्रवचनातून विशद केले.
तर विश्वस्त व प्रवचनकार भाऊ पाटील यांनी प्राचीन काळापासूनच गुरूला आपल्या शिष्यांच्या हृदयात अनन्य स्थानप्राप्ती आहे. हिंदू धर्माच्या सर्व पवित्र लेखनात गुरुंचे महत्त्व, ज्ञान आणि शिष्य यांच्यातील विद्यमान उल्लेखनीय दुवा म्हणजे गुरू यावर जोर देण्यात आला आहे. ‘माता पिता गुरु दैवम’ या प्राचीन संस्कृत संज्ञेनुसार आईला प्रथम प्राधान्य असते, त्यानंतर वडील, गुरु आणि शेवटी देव आहे असे सांगून गुरुची महती व गुरुपौर्णिमा उत्सवाबाबत सविस्तर विवेचन केले.
अनिल पवार व कुटुंबीयांनी समाधी मंदिर परिसरात चार साफसफाई यंत्रे भेट दिली. महाप्रसाद वाटपासाठी तालुक्याच्या परिसरातील सर्व महाविद्यालय विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावर्षीही चाळीसगाव, चांदवड, साकुर, मालेगाव, पाटोदा, येवला, वैजापूर आदी परिसरातून जनार्दन स्वामींच्या पालख्या येथे दाखल झाल्या होत्या.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने प्रत्येकी २१ साखर पोते, बोडखे परिवाराने वीस क्विंटल हरभरा डाळ, भाऊ पाटील व मित्र मंडळाने महाप्रसादासाठी २१ क्विंटल तांदूळ दान केले अशी माहिती अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी दिली. जगातील एकमेव मंदिर असलेल्या बेट भागातील श्री गुरु शुक्राचार्य, कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासी बाबा, मंजूर शिवानंदगिरी महाराज आश्रम, सावरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठात, श्रीकृष्ण मंदिर संवत्सर व जेऊर कुंभारी, गोदातीरी असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरासह विविध ठिकाणी गुरुपाद्यपूजन करून भाविकांना प्रवचनातून ज्ञानामृत देण्यात आले. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने यंदा गोदावरी नदीस पाणी नव्हते, जुनी गंगा देवी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती.