नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करा – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : सध्या नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असून, या कामामुळे कोपरगावनजीक पुणतांबा चौफुली येथे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे या सोमवारी दुपारी कोपरगावहून शिर्डीकडे जात असताना त्यांना पुणतांबा चौफुली येथे ट्रॅफिक जाम झाल्याचे पहावयास मिळाले. नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावे आणि या महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. 

नगर-मनमाड महामार्ग हा उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव, शिर्डी, शनी शिंगणापूर यासारखी जागतिक दर्जाची अनेक धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळामुळे तसेच वाढत्या औद्योगिकरणामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा हा जवळचा रस्ता असल्याने या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते.

नगर-मनमाड महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाल्याने अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडी अशा अडथळ्यांचा सामना करत वाहन चालवणे चालकांना त्रासदायक ठरत आहे. नगर-मनमाड महामार्गाचे रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम तात्काळ करावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. कोल्हे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणअंतर्गत नगर-मनमाड महामार्गावर सावळी विहीर ते कोपरगाव या पहिल्या टप्प्यातील रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी खोदलेला रस्ता व पावसामुळे झालेला चिखल यामुळे वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात पडून अपघात होत आहेत.

कोपरगावनजीक पुणतांबा चौफुली येथे अशा घटना सतत घडत आहेत. पुणतांबा चौफुली येथे नगर-मनमाड महामार्ग व मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब बनली आहे. सोमवारी (२६ जून) दुपारी वाहतूक कोंडीमुळे या महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही बाब या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गाडीतून उतरून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी या महामार्गाच्या कामासंदर्भात चर्चा केली.

नगर-मनमाड महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. नगर-मनमाड महामार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होऊन नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या महामार्गावर शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर, कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर, कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ, शनी शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान आदी अनेक धार्मिक स्थळे असून, या ठिकाणी रोज लाखो भाविक-भक्त भेट देत असतात. सध्या लग्नसराई सुरू असून, आषाढी यात्रेसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वर्दळ नगर-मनमाड महामार्गावर वाढली आहे.

येत्या ३ जुलैला गुरू पौर्णिमा उत्सव असून, त्यानिमित्ताने शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर, कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर, सद्गुगुरू शुक्राचार्य महाराज मंदिर, कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ आदी ठिकाणी भाविक-भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. नगर-मनमाड महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या, प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी तसेच वळण रस्ता रुंद करून वाहतूक सुरळीत करावी, अशा सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक मेनन, ठेकेदार आणि सबंधित इतर विभागाच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.