कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : अर्धवट, चुकीच्या किंवा अफवायुक्त ऐतिहासिक माहितीवर विसंबून राहिल्याने तीच माहिती खरी मानल्याने बऱ्याच वेळा समाजामध्ये गोंधळ उडतो. कोणाला आदर्श मानावे आणि कोणाकडून प्रेरणा घ्यावी. याबद्दल तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. दुसरे असे की यामुळे अनेक वेळा समाजात महापुरुषांबद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊन त्यांच्याबद्दल समाजात कलुषित दृष्टिकोन निर्माण होण्याचा व जातीय-धर्मीय तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो.
हे टाळण्यासाठी तरुण पिढीने खरा इतिहास वाचला पाहिजे, तो वस्तुनिष्ठपणे समजावून घेतला पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध कादंबरीकार, पानिपतकार आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी केले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या मातोश्री सुगंधा त्र्यंबक चांदगुडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त चासनळी येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ, शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे. गौरवशाली व आदर्श इतिहास त्यांनी घडविला आहे. याचे अनेक दाखले आहेत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, तेव्हा शहाजीराजे भोसले हे बादशहाच्या दरबारात होते. मात्र, त्यांच्या अंगालाही कुणी हात लावण्याची हिंमत केली नाही.
कारण त्यांनी, त्यांची चाकरी अतिशय इमाने इतबारे केली होती. त्यातून शत्रूच्या मनातही त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त, नैतिक धाक निर्माण झालेला होता. हा सर्व ज्वलंत, नैतिक, चारित्र्यसंपन्न व गौरवशाली इतिहास तरुण पिढीने जाणीवपूर्वक वाचला पाहिजे. तो समजावून घेतला पाहिजे. म्हणजे त्यांच्या जीवनात जर निराशा असेल ती झटक्यात दूर होईल. असे प्रतिपादन विश्वास पाटील यांनी केले.
मातोश्रींच्या प्रथम स्मृतिदिनी परंपरेने चालत आलेल्या सर्व धार्मिक कर्मकांडांना फाटा देत चांदगुडे कुटुंबियांनी यावेळी विविध सामाजिक संस्थांना मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला. यामध्ये मुकबधीर विद्यालय कोपरगाव, वात्सल्य वृद्धाश्रम, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मायभूमी सोशल फाउंडेशन चासनळी यांचा समावेश होता.
यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थीनींचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक कुप्रथांना तिलांजली देण्यात आली. त्यात कार्यक्रमात महिलांना जाणीवपूर्वक उजव्या बाजुला बसविणे. जेवणाचा मान प्रथम महिलांना देणे, मंचावर केवळ महिलांना बसविणे आदी बाबींतुन महिलांचा सन्मान जपण्यात आला.
यामुळे परीसरात चांदगुडे कुटुंबाचे कौतुक होत आहे. एक वर्षांपूर्वी जेव्हा चांदगुडे यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळीही त्यांचे मरणोत्तर देहदान केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड रंजना गवांदे यांनी केले. गौरवार्थी सामाजिक संस्थांचा परिचय किरण चांदगुडे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन सोमनाथ चांदगुडे यांनी केले.