शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : महायुती शासनाच्या माध्यमातून मुंख्य मत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध केल्याने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा झंजावात सुरू झाला असून शेवगावसह तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील रहदारीच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही कामे दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजे यासाठी त्या त्या परिसरातील नागरिकांनी सुद्धा जागरूक राहणे आवश्यक आहे. रहदारीचे रस्त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होत असतो. विकासाची ही गंगा या पुढील काळातही अधिक वेगाने वाहती राहण्यासाठी आपण आपली शक्ती माझ्या मागे उभी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
येथील खालची वेस परिसरातील पावन हनुमान मंदिरातील सभा मंडपाचा, तसेच शहरातील दशक्रीयेसाठी अद्यावत घाट अशा विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार राजळे यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि त्यातून ते बिन बुडाचे आरोप करीत आहेत. शेवगाव नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर पहिले अडीच वर्ष ज्यांची सत्ता होती त्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वेळी ज्यांच्याकडे सलग तीस चाळीस वर्ष ग्रामपंचायतची सत्ता होती त्यांनी आपल्या कार्यकाळात साधी ग्रामपंचायतची नवीन इमारत बांधली नाही. पूर्वीची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनल्यानंतर गावात शासकीय भूखंड उपलब्ध नसल्याने त्या भूखंडावर अनेकांनी कब्जा जमविल्याने त्याची चौकशी झाली तर अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे.
सध्याचे नगरपालिकेचे कार्यालय जनतेच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असल्याच्या तक्रारीनंतर पुन्हा नवीन जागेचा शोध सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. तालुक्यातील बहुतेक संस्था आमच्या ताब्यात असल्याची आत्मप्रौढी ते मिरवितात मात्र त्यापैकी किती संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत तर किती संस्था रडत खडत सुरू आहेत ते जनतेने तपासावे. त्यामुळे तालुक्याचा हक्काचा लोकप्रतिनिधी पाहिजे असे म्हणण्याचा त्यांना अजिबात अधिकार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले .
पावन मारुती ट्रस्टचे अध्यक्ष मोहन काळे मच्छिंद्र बर्वे राजू जगनाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, माजी जि प सदस्य अशोक आहूजा नितीन मालानी महेश फलके सागर फडके बापूसाहेब धनवडे गणेश रांधवणे गोविंद जाधव दिलीप महाराज गायकवाड डॉक्टर नीरज लांडे, द्वारकानाथ बिहानी, शारदा काथवटे विष्णुपंत घनवट, रवी सुरवसे, हरीश शिंदे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगतसिंग क्रीडा मंडळ पावन हनुमान मंदिर ट्रस्ट च्यावतीने आ. राजळे यांचा सन्मान करण्यात आला सुरेश लांडे यांनी आभार मानले दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले त्याआधी तालुक्यातील खरडगाव, थाटे, लाडजळगाव, दिवटे, गायकवाड जळगाव आदी ठिकाणी आ. राजळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.