चैतालीताई काळेंच्या हस्ते क्रीडा महोत्सवाच्या विजेत्यांना बक्षीस वितरण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये (दि.३) व (दि.४) या दोन दिवसीय  भव्य राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी विजयी संघाच्या सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांचे अभिनंदन करून उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चैतालीताई काळे म्हणाल्या की, क्रीडा क्षेत्रात गौत्न पब्लिक स्कूलचा नावलौकिक खूप मोठा आहे. जिल्हा, राज्य व देशपातळीवर होणाऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंना आवश्यक ते प्रशिक्षण, मार्गदर्शन व सोयी सुविधा गौतम पब्लिक स्कूल मध्ये उपलब्ध असून लवकरच हॉकीसाठी सँड टर्फ मैदान देखील तयार करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात हॉकी वृद्धिंगत करण्यामध्ये गौतम पब्लिक स्कूलचा वाटा सर्वात मोठा असल्याची कबुली याप्रसंगी खास करून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर तसेच जॉईंट सेक्रेटरी हॉकी अजीज सय्यद यांनी दिली. याप्रसंगी संस्था विश्वस्त सिकंदर पटेल, विश्वस्त बाबासाहेब कोते उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवात राज्यातील पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित फुटबॉल, हॉकी व व्हॉलीबॉल मुली असे एकूण ३० संघ सहभागी झाले होते. संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे यांचा वाढदिवस राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी मागील वर्षा पासून सुरू केली आहे. दोन दिवस पार पडलेल्या व अतिशय रोमांचक ठरलेल्या या स्पर्धेत गौतम पब्लिकच्या हॉकी व फुटबॉल संघाने सर्वच संघाना पराभवाची धूळ चारून विजेतेपदाचा चषक पटकाविला आहे. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य नूर शेख, सौ. रईसा शेख, गौतमचे विजयी संघ, शाळेचा क्रीडा विभाग व हाऊस मास्टर्स उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, हॉलीबॉल प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाऊस मास्टर्स, शिक्षक वृंद, एनसीसी, स्काऊट यांनी मेहनत घेतली.