लाखो रुपयांना गंडा घालणारे तिघे शेवगाव पोलिसांच्या ताब्यात

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी, शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील तीन आरोपींना शेवगाव पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी प्रथमवर्ग न्यायाधीशांनी सुनावली आहे.

सुनिल बाबासाहेब पुरी, बाबासाहेब गोरक्षनाथ पुरी वरिल दोघे (रा.रावतळे कुरुडगाव ता.शेवगाव), शिवाजी कचरु वंजारी (रा.नजिक बाभुळगाव ता.शेवगाव) या तिघांना दोन वेगवेगळ्या फसवणुकीचा गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सुभाष जनार्धन आंधळे ( रा.सोनेसांगवी,ता.शेवगाव)  यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, रामेश्वर शिवाजी वंजारी व शिवाजी कचरु वंजारी या दोघांनी आंधळे यांच्या घरी जाऊन, नजिक बाभुळगाव येथे वेल्थ मेकर या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंगचे ऑफीस सुरु केले आहे, पैश्याची गुंतवणुक करा. त्या पैशाच्या मोबदल्यात दरमहा १२ टक्के प्रमाणे परतावा देऊ, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानुसार आंधळे यांनी चार लाख रुपये वेळोवेळी गुंतवणूक केले. त्या बदल्यात त्यांना एचडीएफसी बँकेचा धनादेश तसेच नोटरी करुन देण्यात आले. त्यांनतर आंधळे यांना दोन महिने परतावा दिला. त्यांनतर परतावा देण्यास टाळाटाळ करुन पळून गेले.

आंधळे यांच्यासह रंगनाथ रामनाथ वाघ २ लाख ५० हजार, नामदेव सुर्यभान धायतडक ४ लाख, संजय राधोबा साळवे ८ लाख, तुषार जनार्धन कांबळे ७ लाख रुपये, अशी एकुण २८ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या फिर्यादीमध्ये संजय सुधाकर जोशी (रा.गदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये, त्यांच्यासह इतर लोकांची अनिल बाबासाहेब पुरी, बाबासाहेब गोरक्ष पुरी, सुनील बाबासाहेब पुरी यांनी २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले. पोलिसांनी आरोपींना बीड, छत्रपती संभाजी नगर येथून सापळा रचून ताब्यात घेतले.

     सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक महेश माळी, पोलीस सहायक निरीक्षक अमोल पवार, कर्माचारी परशुराम नाकाडे, संदिप आव्हाड, शाम गुंजाळ, बाप्पासाहेब धाकतोडे, संतोष वाघ, संपत खेडकर, रुपाली कलोर, सायबर सेलचे राहुल गुड्डु यांनी केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश माळी व अमोल पवार हे करत आहेत.