सप्तश्रुंगीच्या पादुका दर्शनाला भाविकांची गर्दी

कोपरगाव प्रतिनिधी,दि.१७ : आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे कोपरगाव शहरात सोमवार (दि.१६) रोजी साधू संतांच्या उपस्थितीत ढोल पथकांच्या निनादात आणि तुतारीच्या आवाजात आकर्षक पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी उसळली होतो. कोपरगाव शहरातील चौकाचौकात असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन करून आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आ. आशुतोष काळे यांनी आणल्या आहेत.

या पादुकांचे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी या पावन पादुका कोपरगाव शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर, श्री लक्ष्मीआई माता मंदिर, मुंबादेवी मंदिर, श्री कालिकामाता मंदिर, श्री सप्तश्रृंगी मंदिर व श्री जगदंबा माता मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या, आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी कोपरगावकरांची एकच गर्दी उसळली होती. या पादुकांची सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी ४ वाजता सजविलेल्या पालखीतून श्री जब्रेश्वर मंदिरापासून कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या आ. आशुतोष काळे यांनी प्राचीन शिवकला असलेली पारंपारिक वाद्य संबळ वाजवला. चैताली काळे व वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळले आणि काठी फिरविण्याचा साहसी खेळ खेळून या मिरणुकीत देहभान विसरून सहभागी झाले होते.चैताली काळे यांनी देखील आई भगवतीचा देव्हारा डोक्यावर घेवून महिला भाविकांचा उत्साह वाढविला.

 यावेळी आ. आशुतोष काळे व चैताली काळे यांनी पालखी खांद्यावर घेवून पालखी मार्गस्थ झाली. या पालखीचे चौका-चौकात महिला भगिनींनी पूजन करून पावन पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लेझीम पथकाने तसेच मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांचे वेधून घेतले होते. मुलींनी आदिशक्तीची विविध रूपे साकारून भाविकांना मंत्रमुग्ध करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्यामुळे भक्तीमय वातावरण तयार झाले होते.

यावेळी प.पु. रमेशगिरीजी महाराज, प. पु. परमानंदगिरीजी महाराज, प.पु. विवेकानंदगिरीजी महाराज, प.पु. जितेंद्रानंदगिरीजी महाराज, प.पु. राजनानंदगिरीजी महाराज, प.पु. प्रेमानंदगिरीजी महाराज, परमपूज्य राजेश्वरगिरीजी महाराज, परमपूज्य शरदानंदगिरीजी महाराज, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅड दिपक पाटोदकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.