रखडलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी विविध विभागातून मिळविलेल्या निधीतील अनेक कामे अपूर्णावस्थेत असून हि कामे तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना दिल्या आहेत. कोपरगाव मतदार संघातील कामांचा आढावा घेण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांची संयुक्तिक बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

आ. आशुतोष काळे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदार संघाच्या शासकीय रस्ते व शासकीय इमारतींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. यामध्ये अर्थसंकल्प, समाजकल्याण विभाग, लेखाशीर्ष २५१५, लेखाशीर्ष ३०५४ आदी विभागांच्या माध्यामतून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.

या निधीतून अनेक महत्वांच्या रस्त्यांचा विकास होवून नागरिकांच्या अडचणी कायमच्या सुटल्या आहेत. परंतु मतदार संघातील कित्येक कामांना निधी उपलब्ध असुन देखील अनेक कामे रेंगाळलेली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांकडून त्याबाबत असणाऱ्या अडचणी व माहिती जाणून घेत कामांचा आढावा घेतला.   

यावेळी बैठकीस उपस्थित असणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांना सूचना करतांना त्यांनी कामे वेळेत करण्याबरोबरच विकास कामांच्या दर्जाकडे दुर्लक्ष होवू देवू नका. कोणत्याच विकासकामांना वारंवार निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याची काळजी घ्या. काही अडचणी असतील तर मला सांगा त्या अडचणी मी दूर करीन परंतु विकासकामे थांबू देवू नका अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे त्यांचे सहकारी कर्मचारी व उपस्थित ठेकेदारांना दिल्या आहेत.