के. जे. सोमैया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या वर्षीच्या ३५० व्या शिवराज्याभिषकाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याच्या दृष्टिकोनातुन ‘’३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा” ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करुन वाचन प्रेरणा दिन साजरा केला गेला. महाविद्यालयातही वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधुन ग्रंथालय विभागाच्या वतीने शिवचरित्राचे व्याख्याते गौरव पवार यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीति’ या विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीति विषद करतानाच शिवाजी महाराजांच्या कार्याचे विविध पैलू अधोरेखित केले. स्वागत मनोगतात प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी वाचन प्रेरणा दिन व वाचन संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रो. (डॉ.) एस. आर. पगारे हे उपस्थित होते. ग्रंथालय विभागात शिवचरित्र ग्रंथाचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव संजिव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, गौरव पवार, प्रा. निता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमांचे प्रास्ताविक ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. निता शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी तर आभार विकास सोनवणे यांनी मानले. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील कर्मचारी रवि रोहमारे, गणेश पाचोरे, स्वप्नील आंबरे, शुभम पाचोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.