कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला उर्जा देणारा व ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक कलेला वाव देणारा हा एक्स्पो म्हणजे कोपरगावकरांसाठी नवी पर्वणी असतो. अशा भव्य दिव्य एक्स्पोचा शुभारंभ गुरुवारी होणार असल्याची माहीती एक्स्पो आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
लायन्स बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवतर्गत “शिवबा माझा मानाचा एक्स्पो आपल्या गावाचा” हि थीम घेवून शिवसृष्टी साकारणार असून पस्तीस कलाकारांचे महानाट्य, छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लेझर शो व हास्य कवी संमेलन या विशेष आकर्षणंसह सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांची रेलचेल असणार आहे.
तालुक्याच्या बाजारपेठेला बुस्टर डोस मिळावा या हेतूने विविध स्टाॅलसह हा महोत्सव नऊ ते चौदा मार्च दरम्यान शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन येथे होणार आहे. एक्पोचे हे बारावे वर्षे असून कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह मुख्य प्रायोजक तर संजीवनी समूह, गोदावरी दुध व समता पतसंस्था हे सहप्रायोजक आहेत.
लायन्स लीनेस व लिओ क्लबच्या वतीने पत्रकार परिषदेत एक्स्पोच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी लायन्स अध्यक्ष परेश उदावंत, चार्टर्ड मल्टीपल प्रेसिडेंट डॉ. वर्षा झंवर, लीनेस अध्यक्षा डॉ. अस्मिता लाडे, लिओचे सुमित सिनगर, सुधीर डागा, तुलसीदास खुबानी यांच्यासह तिन्ही क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
गुरुवार दि. ९ मार्च रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून याच दिवशी लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. १० मार्च रोजी किल्ले बनवा, चित्रकला स्पर्धेसह “रायबा हेच का आपल स्वातंत्र” या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. ११ मार्च रोजी निबंध स्पर्धा व लिटील चॅम्प ग्रुप डान्स, १२ मार्च रोजी हास्य कवी संमेलन, १३ मार्च रोजी वक्तृत्व व सुपर स्टार ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे.
१४ मार्च रोजी पारितोषिक वितरण व नृत्याविष्कार हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. लायन्स शैलेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन तर आभार बाळासाहेब जोरी यांनी मानले. यावेळी धरमचंद बागरेचा, पराग संधान सत्येन मुंदडा, सचिन भडकवाडे, आप्पासाहेब शिंदे, राम थोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.