महिला पोलीसाची छेड काढणाऱ्या पोलिसाची विशाखा समितीमार्फत चौकशी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : अखेर शेवगाव पोलिस ठाण्यातील ‘ त्या ‘ पोलिसाची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतर त्या संदर्भात पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अधिकृत सुत्राकडून समजली. शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी एका पोलिसाकडून आपल्या एका सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीच छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मात्र या घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. विशेष म्हणजे त्या दिवशी घटनेसी संबंधित पोलिसाची रजा होती. मात्र तो काही कामानिमित्त ठाण्यात आला होता. यावेळी घडलेल्या प्रकाराबाबत त्या महिला पोलिसांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षकना समक्ष भेटून तक्रार अर्ज दाखल केला.

त्यानुसार झालेल्या प्रकाराची खात्यांतर्गत विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असून समिती प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आपला अभिप्राय अहवाल सादर करतील. त्यानंतर याबाबत संबंधित पोलिसावर कारवाई करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे  सांगण्यात आले.

  या घटनेची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांशी केलेले असंभ्यवर्तन अत्यंत गैरप्रकारचे असल्याने व त्यातून पोलीस खात्याची बदनामी होत असल्याने याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख कोणता निर्णय घेणार? याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात घटना घडली तेव्हा संबंधित पोलिसाची पत्नी देखील तेथे येऊन पिडित महिलेस दमबाजी करत होती. हे तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये  कदाचीत  सापडू शकेल असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या  पोलिसाचे मागील रेकॉर्डही संशयास्पद व या घटनेला पुष्टी देणारे आहे. या पोलिसाने घारगाव येथे कार्यरत असतांना एका घटस्फोटीत महिलेशी ‘जीवनसाथी डॉट. कॉम’ या लग्नगाठी जुळविणार्‍या संकेतस्थळावरुन लग्नाची मागणी घालीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, तसेच तिला व तिच्या दहा वर्षीय मुलीला मारहाण, दमदाटी करणे व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी  या पोलिसावर अत्याचार, अॅट्रोसीटी, बेकायदा गर्भपात व पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यात त्या महिलेस लग्नाचे अमिष दाखवित ८ ते १० महिने तिच्यावर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली, ही गोष्ट समजताच त्याने त्या महिलेच्या इच्छे विरुद्ध बळजबरीने तीचा गर्भपात केला. तसेच तिच्या दहा वर्षीय मुलीलाही मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून अखेर या महिलेने संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक यांचे पुढे मांडलेल्या कैफियतीवरून त्यांनी या पोलिसासह  त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य तीघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भा.द.वी ३७६, ३७६ (२) (एन ), ३१३,   ३५४, ३५४ (ए), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचे न्यायालयीन फेरे मिटले नाहीत तोच शेवगावी त्याचेकडून असा प्रकार घडलाय. काळ आणखी सोकावू नये म्हणून त्याच्या या  ‘ हॅबिच्चुअल ‘ मानसिकतेचा गांभीर्याने विचार व्हावा अशी शेवगावकरांची अपेक्षा आहे.