नगरपरिषदेकडे मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आंदोलनाचा ईशारा – चंद्रकांत कर्डक

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, नगरपरिषद कर्मचा-यांचा समावेश व्हावा, नगरपरिषद कर्मचा-यांची ग्रामपंचायत कालीन भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी, रमाई घरकुल योजनेच्या प्रस्तावासाठी नगरपरिषदेचा उतारा ग्राह्य धरून शासनाच्या दि.९ मार्च २०१० रोजी आदेशानुसार घरकुल प्रस्ताव संबंधीत कार्यालयाकडे सादर करण्यात यावे.

शहरात महिला व पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची उभारणी करावी. शहरातील आठवडे बाजार, गट नंबर १६१९/१ मधील सरकारी जागा तसेच जुना सरकारी दवाखाना या ठिकाणी पे आणि पार्किंगची योजना राबवावी त्याच बरोबर बस स्थानक चौकातील क्रांती स्तंभाची दुरुस्ती करावी, आदी मागण्यासाठी शेवगाव नगरपरिषदेसमोर भीमशक्ती, पँथर रिपाई तसेच बोधिसत्व युवा संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी जि. प. सदस्य पवन साळवे, माजी जि. प. सदस्य तथा भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत कर्डक, अर्जुन लांडे, सुनील बोरुडे, प्रवीण अंधारे, कुणाल इंगळे, रामेश्वर तुजारे, आदींची उपस्थिती होती.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राउत, कार्यालयीन अधीक्षक कोल्हे, घरकुल विभागाचे समाधान मुंगसे, यांनी आंदोलकांशी चर्चा करून. वरील मागण्या बाबत दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केल्यानंतर पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पुकारण्यात आलेले जन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार माजी जि. प. सदस्य चंद्रकांत कर्डक यांनी जाहीर केला.