समता स्टडी पॉईंट हा स्तुत्य उपक्रम – जिल्हाधिकारी सालीमठ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : कोपरगाव तालुक्यातील तरुण पिढी सुशिक्षित घडून देशाचे सुजाण नागरिक घडावे. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत कोपरगाव तालुक्यातील मुलांनी यश संपादन करून देशाची सेवा करावी. या उद्देशाने सुरू केलेला समता स्टडी पॉईंट हा स्तुत्य उपक्रम असून वाखणण्याजोगा आहे. या पॉईंटच्या माध्यमातून कोपरगावकरांची मुले शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात यश संपादन करतील असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

कोपरगाव नगरपरिषद व समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘समता स्टडी पॉईंट’ अभ्यासिका व समता वाचन कक्षाचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या मुलांची बौद्धिक मूल्यमापन करण्याची सूचना नगरपालिकेला देत पुस्तकांची कमतरता भासल्यास जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच अभ्यासिकेची व वाचन कक्षाची जबाबदारी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या सह त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल.

उद्घाटन पर प्रास्ताविक करताना समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरू असून कोपरगावकरांच्या ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत यश संपादन करण्याची समता स्टडी पॉईंट च्या माध्यमातून सुवर्णसंधी आहे. या अभ्यासिकेतील मुलांसाठी समताकडून विद्यार्थ्यांसाठी वारंवार मार्गदर्शनपर शिबीरेही आयोजित करणार आहोत. समता परिवाराने व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन द्वारा विविध उपक्रम राबवून त्यांना मूर्त रूप दिलेले आहेत.

तसेच मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे केवळ मुख्याधिकारी नसून प्रशासक देखील आहेत. या अभ्यासिकेची संकल्पना त्यांच्याच कल्पनेतून साकार झालेली आहे. त्यांनी रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरणाची कामे दर्जेदार केली आहेत. नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांमध्ये शहरातील इतर संस्थांनी ही सहभाग नोंदवावा असे आवाहन कोयटे यांनी केले.

तळ मजल्यावर समता वाचन कक्ष, दुसऱ्या मजल्यावर महिला व मुली आणि तिसऱ्या मजल्यावर पुरुष व मुलांसाठी असे ११० मुला-मुलींसाठी दोन प्रशस्त हॉल, स्वच्छ, शांत व प्रसन्न वातावरण, हॉलमध्ये सरस्वती मातेची व श्री गणेशाची आकर्षक मूर्ती, पिण्यासाठी आरोचे स्वच्छ, थंड व गरम पाणी, मुलां व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सेवा निवृत्त शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, उत्कृष्ट प्रतीची कुशन खुर्च्या व फर्निचर अशा पुणे, मुंबई या शहरातील अभ्यासिकेपेक्षाही उत्कृष्ट सुविधा असणाऱ्या या अभ्यासिकेबद्दल महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, संजीवनी इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे, प्राचार्य बी.एस.यादव आदींनी मनोगत व्यक्त करून या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

विद्यार्थिनी अनुपमा कोकणे मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, समाजसेवा म्हणजे काका त्यांनी आमच्या सारख्या ग्रामीण भागातील मुलां – मुलींसाठी सुसज्ज, भव्य-दिव्य अभ्यासिका उभारून उत्कृष्ट सुविधांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याचा कानमंत्र दिला आहे. त्याचा आम्ही नक्कीच फायदा घेऊन विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून काकांच्या समाजसेवेचा आदर्श घेऊ.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, संजीवनी इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे आदींसह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समताचे चेअरमन काका कोयटे, व्हा.चेअरमन श्वेता अजमेरे, संचालक जितु शहा, अरविंद पटेल, संदीप कोयटे, कचरू मोकळ, गुलशन होडे, कांतिलाल जोशी यांनी केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले. या वेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप रोहमारे, प्राचार्य बी.एस.यादव, प्राचार्य रमेश सानप, प्रांत अधिकारी माणिक आहिरे, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे व नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी दिलीप अजमेरे,

शहर पोलीस स्टेशनचे पीआय प्रदीप देशमुख, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष सुमित भट्टड, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, नारायण अग्रवाल, विजय बंब, शाम जंगम, दिपक अग्रवाल, गोपीनाथ निळकंठ आदींसह विद्यार्थी, हितचिंतक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.