वीज दरवाढीवर हरकती नोंदविण्यासाठी आमदार काळे घेणार बैठक

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : सातत्याने वाढत असलेली महागाई कमी होण्याचे नाव घेत नसतांना महावितरण कंपनी वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे या वीज दर वाढीला हरकत घेण्यासाठी सोमवार (दि.६) रोजी सायंकाळी ५.०० वाजता आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कोपरगाव जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, महावितरण कंपनीने ने तोटा होत असल्याच्या नावाखाली वीज नियामक आयोगाकडे तब्बल ३७ टक्के वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. दोन वर्ष कोरोना महामारीचा सामना करून कुठतरी सर्वसामान्य नागरिक सावरत असतांना जर वीज दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास हा वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्य नागरिकांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरणार आहे. त्याचा घरगुती, कृषी, छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांना देखील आर्थिक फटका बसणार आहे.

त्यामुळे या वीज दरवाढीला वेळीच हरकत घेवून वीज ग्राहकांवर लादण्यात येणारी वीज दरवाढ मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त घरगुती, कृषी, छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायिक वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.