दिल्ली येथील ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात के. जे. सोमैया महाविद्यालच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील सुजित शेटे व समीर खवले या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ अमृत कलश संकलन समारोप या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले होते.

या अभिनव उपक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही सक्रिय सहभाग नोंदविला. दि. ३१ ऑक्टोबर रोजी इंडिया गेट, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये के. जे. सोमैया (वरिष्ठ) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सुजित मधुकर शेटे व समीर रामप्रसाद खवले यांनी सोबत नेलेला अमृत कलश संकलन समारोप या उपक्रमामध्ये समाविष्ट केला.

या उपक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कार्यात दिलेल्या या योगदानाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, संस्थेचे सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन केले. महाविद्यालय स्तरावर ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यशस्वीपणे राबविला. यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. एम. बी. खोसे, प्रा. एस. एस. नागरे, डॉ. एस. बी. भिंगारदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले.