प्रस्तावित कायद्याच्या विरोधात तीन दिवस कृषीसेवा केंद्र बंद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कृषी निविष्ठा विक्री प्रकरणात कृषी विक्रेत्यांनाही दोषी ठरवीत त्यांच्याविरोधात नव्या कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, ही बाब अन्यायकारक असल्याचा आरोप करीत याविरोधात दि. २ ते ४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सलग तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेकडून घेण्यात आला.

कोपरगाव फर्टीलायझर पेस्टिसाईड डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सागर कवडे, उपाध्यक्ष किरण मेहत्रे, संचालक तसेच कृषी निविष्ठा विक्रेते पालशेट पहाडे, अश्विन सुराळे, बाबा भोकरे, विशाल ठोळे, शैलेंद्र कुलकर्णी, गणेश देशमुख तसेच तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते यांनी कृषी अधिकारी सोनवणे, कृषी अधिकारी (प. स.) कोष्टी, गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन दिले.

त्यानुसार प्रस्थापित व विधेयक ४० ते ४४ कायद्यातील जाचक नियम व अटी कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर लादण्याचे प्रस्तावित आहे. शासनाने प्रस्तावित कायदे मागे घ्यावे अशी कृषी विक्रेत्यांची मागणी आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पहिल्या टप्प्यात दि. २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येतील. याची दखल न घेतल्यास बेमुदत कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा इशारा कृषी सेवा केंद्र संघटनेकडून देण्यात आला आहे.