कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत आपल्या ज्ञानातुन अनेक नाविन्यपुर्ण प्रयोग करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना देशात नांवलौकीकास्पद कामगिरी करणारा उद्योग समुह म्हणून नावारूपास आणला त्यांच्यानंतर कारखान्याची धुरा बिपीनदादा कोल्हे सांभाळत असुन २१ जुन आंतरराष्ट्रीय योगदिनाला त्यांचा वाढदिवस त्यानिमीत आमचे अनुभवातील बिपीनदादा कोल्हे यातुन आम्ही काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.
कोपरगांव विधानसभा मतदार संघ अवर्षणग्रस्त तालुका. पाटपाण्याच्या सोयीसाठी ब्रिटीशांनी दारणा धरणाची १९०५ मध्ये निर्मीती करून गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे येथील शेतीला पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. परिणामी या भागात शेती बहरली. उस कारखानदारी वाढली आणि त्यातून सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली. शेतीला पाण्याची गरज भासते म्हणून बिपीनदादा कोल्हे यांनी पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम हाती घेत कार्यक्षेत्रात हिंगणी, मंजुर, सडे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, गांवतळी, शेततळी, मातीचे बंधारे, दगडी साठवण बंधारे, गोडबोले गेट बंधारे बांधुन शाश्वत पाणी उपलब्ध करून दिले तर माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेल्या पाझर तलावामधील गाळ लोकसहभागातून काढूनही नवी दिशा देण्यांचे काम केले. – (रमेश घोडेराव, उपाध्यक्ष, कोल्हे कारखाना.)
जिरायत भागातील शेतकरी पाण्यासाठी नेहमीच कासावीस करत असतो. त्याच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून निळवंडे धरणाचे १९७० मध्ये शासनाने बांधकाम हाती घेतले. पुढे काळाच्या ओघात या धरण कामाला पुरेशा प्रमाणांत निधी न मिळाल्यांने हे काम रखडले. धरणाचे काम पुर्ण झाले पण कालवे होत नसल्याने शेतक-यांना पाणी असुनही ते मिळत नाही यासाठी बिपीनदादा कोल्हे यांनी २३ मे २०१२ रोजी नगर मनमाड रस्त्यावरील निर्मळ पिंपरी येथे स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतक-यांसाठी रस्तारोको आदोलन केले. त्यांची हृदयशस्त्रक्रिया करावयाची होती, पण शेती पाण्यासाठी त्यांनी आंदोलनाला प्राधान्य दिले आणि त्यानंतर ते श्रीसाईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी येथे अॅडमिट झाले तेथे त्यांच्यावर अँजीओप्लास्टी करण्यांत आली. हा प्रसंग आजही आठवला तरी उरात धडकी भरते. आज निळवंडे डाव्या कालव्याची पाणी चाचणी झाली हा जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. -(अरुणराव येवले, माजी उपाध्यक्ष, संजीवनी)
बिपीनदादा कोल्हे यांनी कृषी पदवीधर शिक्षण अकोले येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पुर्ण केले. हे शिक्षण पुर्ण करत असतांना विद्यापीठ स्तरावर निवडणुका घेतल्या जायच्या. विद्यार्थ्यांच्या समस्येबरोबरच बाहेरगावहुन शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुला मुलींचे काय हाल होतात याबाबत बिपीनदादा कोल्हे नेहमीच सतर्क असायचे. त्यांच्या ठायी संघटन कौशल्य होतं. विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडणुक लढवायची आम्ही तयारी केली. बिपीनदादा कोल्हे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही त्यांचे पिताश्री तत्कालीन आमदार शंकरराव कोल्हे यांच्याकडे नागपुर अधिवेशनात गळ घातली. पण शंकरराव कोल्हे यांचा खाक्या ते म्हणाले आम्ही तुम्हांला येथे शिकायला पाठविले त्यात अगोदर लक्ष घाला. पण आम्ही सर्व मित्र कंपनी कसले ऐकतो. तत्कालीन कृषिमंत्री नानासाहेब एंबडवार यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडुन बिपीनदादा कोल्हे यांच्या उमेदवारीची संमती मिळविली. तयारी केली बिपीनदादा कोल्हे यांना विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीत निवडुन आणलं हे आमचं पहिलं धाडस. -(प्रकाश सांगळे, कोपरगाव.)
अहमदनगर नाशिक विरुध्द मराठवाडा हा प्रादेशिक पाण्याचा वाद असून उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे त्यात पाण्याची समृध्दी वाढविल्याशिवाय सर्वांना पाणी कसे मिळणार हा प्रश्न होता. त्यातच बारमाही गोदावरी कालव्याभोवती नव्याने वैजापुर गंगापुर भागातील शेतक-यांसाठी नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्याची निर्मीती झाली. २००३ मध्ये या कालव्याची पाणी चाचणी होती. तत्कालीन जलसंपदा मंत्री पद्मसिंह पाटील यांनी मंत्रालयातून थेट तयारी केली. या कालवे चाचणी प्रसंगी गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याचे नुतणीकरणासाठी कमी पडणारा निधी, ११ टीएमसी पाणी, नाशिक शहर आणि सिन्नर पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इंडिया बुलसाठी स्वतंत्र पाण्याची निर्मीती व्हावी, मुकणे उंचीवाढ होवुन ते पाणी कोपरगावसाठी आरक्षीत व्हावे, नाशिकसाठी नव्याने किकवी धरण व्हावे, जलद कालव्यासाठी उर्वरीत भाम, भावली, वाकी धरणे पूर्ण व्हावी, पालखेड डाव्या कालव्यास समांतर कालवा व्हावा, ब्लॉक मुदतवाढ मिळावी. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळवावे, शुन्य ते सत्तर किलोमिटर नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी संपादित शेतक-यांना शेतीसाठी उचल पाण्यांचे परवाने मिळावे आदि मागण्यासाठी बिपीनदादा कोल्हे यांनी थेट मुकणे धरणांवर गेट बंद आंदोलन केले होते. या सा-या प्रश्नांची दखल तत्कालीन जलसंपदा मंत्री पदमसिंह पाटील यांना घ्यावी लागली आणि त्यासाठी शासनस्तरावर निर्णय करण्याची घोषणा केली तेंव्हाच बिपीनदादा कोल्हे यांनी धरण गेटची चावी तत्कालीन मंत्री पदमसिंह पाटील यांना सुपूर्द केली. – (पुंडलिक मुरलीधर देव्हारेकाका, सिंचन तज्ञ नाशिक)
ग्रामिण भागातील मुला मुलींना मुंबई, पुणे, हैद्राबाद, कोलकाता आदि ठिकाणी मिळणा-या दर्जेदार शिक्षणाच्या संधी येथेच परिपुर्ण कशा मिळतील याचा प्रयत्न बिपीनदादा कोल्हे व नितीनदादा कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतून केला आहे. आज घरबसल्या फोर जी, फाइव्ह जी तंत्रज्ञानाने जग समृध्द होत आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब परिपुर्णरित्या कसा होईल यावर त्यांचा सतत कटाक्ष असतो. बालवाडीपासून ते अभियांत्रीकी, तांत्रीक, व्यवस्थापन, पदवी, पदवीका, सैनिकी, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण, पी.एच.डी पर्यंतचे संपुर्ण शिक्षण एकाच छताखाली कसे मिळेल यासाठी संजीवनी बँडनेम तयार करण्यांत त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच बँकींग क्षेत्रात संजीवनीची नव्याने ओळख तयार झाली आहे. – (नारायण अग्रवाल, व्यापारी नेते कोपरगाव. )
बिपीनदादा कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतुन सहकारी साखर कारखानदारीत अनेक नव नविन प्रयोग केले. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्यांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे नांव देशपातळीवर सर्वप्रथम नोंदले गेले. त्यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला. भारतात तसेच परदेशातील साखर उद्योगांचा अभ्यास करून त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान संजीवनीत आत्मकेंद्रीत करत त्यातुन इथेनॉल उत्पादनाचा पाया घातला. आसवनी प्रकल्पातून बाहेर पडणा-या सांडपाण्यावर (बायोगॅस) प्रक्रिया करून त्यातुन बुट तत्वावर वीज तयार केली आहे. उस आणि त्यापासून बाहेर पडणारा प्रत्येक घटक किती महत्वाचा आहे हे ओळखून ते आजही काम करत आहे. – (कैलासराव माळी, माजी उपाध्यक्ष, संजीवनी)