कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीचे काम सुरू  

स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

कोपरगाव प्रतीनिधी, दि. २२ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार व भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर केलेला २८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही कामांच्या निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. आता मंजूर निधीतून या दोन्ही इमारतींच्या नूतनीकरणाच्या प्राथमिक कामास प्रारंभ झाला आहे.

येत्या काही दिवसांत ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी वसाहत इमारतीचे काम पूर्ण होऊन कोपरगावच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन नवीन वास्तू उभ्या राहणार आहेत. या दोन्ही कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

यापूर्वी कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी एकच पोलिस ठाणे कार्यरत होते. कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण अशा दोन स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीची अवस्था लक्षात घेऊन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मिळवून दिला.

या निधीतून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याची नवीन सुसज्ज वास्तू उभारण्यात आली आहे; परंतु कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यापासून या ठाण्यासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नाही. सध्या ज्या ठिकाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे कामकाज चालत आहे तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाज करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.

तसेच अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पोलिस कर्मचारी वसाहतीतील घरांचीदेखील दुरवस्था झाली आहे. ही वसाहत सद्य:स्थितीत पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी योग्य नाही. या जुन्या झालेल्या वसाहतीत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला.

तसेच उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देऊन त्यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीकरिता २८ कोटी ५० लाख रुपये निधी यापूर्वीच मंजूर केलेला आहे. या कामाच्या निविदा याआधीच प्रसिद्ध झाल्या होत्या. आता सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामीण पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहत इमारतीच्या प्राथमिक स्वरूपातील कामास सुरुवात करण्यात आली आहे.

बुधवारपासून ग्रामीण पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहत या दोन्ही इमारतींचे नूतनीकरणाचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या २८ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून ग्रामीण पोलिस ठाण्याची नवीन इमारत व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी २ बीएचकेचे ५६ फ्लॅट, ३ बीएचकेचे ८ फ्लॅट, कंपाऊंड वॉल, पार्किंग व्यवस्था, वसाहतीअंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाईन, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ही सर्व कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होऊन नवीन ग्रामीण पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत जनतेच्या सेवेत दाखल होणार असून, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन वसाहत तयार होऊन पोलिस कर्मचारी बांधवांची गैरसोय दूर होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न अखेर स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी तसेच जनतेने स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.