कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन इमारत उभारण्यात येणार असून, या नवीन इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट करताना श्री साईबाबांच्या जीवनचरित्राच्या थीमचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बिपीन कोल्हे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी ही जगाला ‘श्रद्धा और सबुरी’ हा महामंत्र देणारे श्री साईबाबा यांची तपोभूमी असून, या ठिकाणी श्री साईबाबांचे समाधी मंदिर आहे. जागतिक ख्याती मिळवलेले शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज असंख्य भाविक येतात.
शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांच्या सोयीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. त्यांच्याच कार्यकाळात १ ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण झाले होते. शिर्डी विमानतळावरून ये-जा करणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वी या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा सुरू करण्यात आल्याने विमान सेवेत वाढ झाली आहे.
शिर्डी विमानतळावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या वतीने या ठिकाणी नवीन प्रवासी टर्मिनल इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात येणाऱ्या या नवीन इमारतीसाठी राज्य शासनाने ५२७ कोटी रुपयांची तरतूद केलेली असून, या कामाची निविदा नुकतीच प्रसिध्द झाली आहे.
या नवीन इमारतीमुळे विमानतळाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या इमारतीची आतील व बाहेरील बाजूची सजावट करताना श्री साईबाबांच्या जीवन चरित्राच्या थीमचा समावेश करण्यात यावा. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी मंदिराच्या इमारतीची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे.
त्या ठिकाणी असलेली इमारत भगवान तिरुपती बालाजी यांच्या चरित्रावर आधारित असलेल्या प्रसंगानुरूप सजावट करून तयार करण्यात आलेली आहे. तशाच प्रकारे काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्तावित असलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीच्या आतून व बाहेरून श्री साईबाबा यांच्या जीवनचरित्राची थीम वापरून आकर्षक सजावट करण्यात यावी, अशी मागणी बिपीन कोल्हे यांनी निवेदनात केली आहे.
शिर्डी विमानतळावर नवीन इमारत उभारताना इमारतीच्या आतून व बाहेरून श्री साईबाबा यांच्या जीवनचरित्राची थीम वापरून आकर्षक सजावट करावी, जेणेकरून विमानतळावर ये-जा करणाऱ्या साईभक्तांना व प्रवाशांना या ठिकाणी आल्यावर श्री साईबाबांच्या जीवनकार्याची माहिती होईल व त्यांच्यामध्ये साईभक्तीची भावना निर्माण होईल. तसेच श्री साईबाबांचा ‘श्रध्दा आणि सबुरी’ चा संदेश जगभर प्रसारित होण्यास मदत होईल, असे बिपीन कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.