कर्जाचा विनीयोग योग्य कामासाठी करावा- बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : शासकीय निमशासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळून त्याचा थेट लाभार्थ्याला उपयोग व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकडी येथे शासन आपल्या दारी घेतलेला उपकम योग्य असून लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा विनीयोग लाभार्थ्यांनी योग्य कामासाठी करावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

शहरातील स्वाती शरद त्रिभूवन, सुजल छगनराव चंदनशीव या दोन लाभार्थ्यांना लोकशाहिर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाअंतर्गत प्रत्येकी एक लाख रूपयांचे धनादेश प्राप्त झाले त्यानंतर लाभार्थ्यांनी बिपीन कोल्हे यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तळागाळातील उपेक्षीत दीन दलित समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाची माहिती देत स्वतंत्र विभागामार्फत यासाठी केल्या जाणा-या कामाचा आढावा सांगितला.

केंद्र व राज्य शासन प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने झटत आहे. लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळ हे वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी नेहमीच मदत करत आहे. त्याअंतर्गत मिळणा-या कर्जाचा विनीयोग कर्जदारांनी योग्यप्रकारे करून आपल्याबरोबरच समाजाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी काम करावे असेही ते म्हणाले. 

प्रारंभी माजी नगरसेवक जंगु सहादु मरसाळे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोकशाहिर आण्णाभाउ साठे विकास महामंडळाचे अधिकारी आर. एन. राठोड, परिणिती बोराडे, संतोष ससाणे यांच्यामार्फत कागदपत्रांची पुर्तता करून वंचित घटकांपर्यंत लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, रविंद्र बबनराव शेलार आदि उपस्थित होते. शरद त्रिभूवन यांनी आभार मानले.