सहायक वनसंरक्षक अमोल गर्कल यांना उच्च न्यायालयाचा दणका

पन्नास हजाराचा बजावला वाॅरंट

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२: -उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणी सहायक वनसंरक्षक अमोल गर्कल (अहमदनगर) यांना उच्च न्यायालयाने दणका देत पन्नास हजाराचा वाॅरंट काढला असल्याची माहिती विधिज्ञ विद्यासागर शिंदे यांनी दिली.

विधिज्ञ शिंदे यांनी सांगितले कि, वन विभागाच्या राखीव वनामध्ये मुरुमाचे उत्खनन केले म्हणून येथील सुनील आनंदराव यादव यांच्या मालकीची एक प्रोकलेन व तीन हायवा ढंपर येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी गुन्हा दाखल करून जप्त केली होती. सदर कार्यवाही विरुद्ध अॅड विद्यासागर शिंदे यांनी सहायक वनसंरक्षक यांच्याकडे व त्यानंतर कोपरगाव जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते.

सदर प्रकरण जिल्हा न्यायालयामध्ये फेटाळले गेले. त्यानंतर अॅड गणेश गाढे यांनी उच्च न्यायालयात झालेली कार्यवाही रद्द करण्यासाठी कायदेशीर बाजू मांडली .उच्च न्यायालयाने वन खात्याने केलेली संपूर्ण कार्यवाही रद्दबादल ठरवून जप्त केलेली वाहने मूळ मालकास परत देण्याचे १० एप्रिल २०२३ रोजी आदेश केला. सदर आदेश होऊन हि सहायक वनसंरक्षक यांनी उच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. म्हणून त्यांच्या विरुद्ध अॅड गणेश गाढे यांच्या मार्फत अवमान याचिका दाखल करण्यात आली.

सहायक वनसंरक्षक यांनी अवमान याचिकेतील आदेश न पाळल्याने उच्च न्यायालयाने त्यांचे विरुद्ध पन्नास हजार रुपयांचे वाॅरंट काढले आहे. या आदेशामुळे वन खात्यातील मुजोरी पुढे आल्याचे दिसून आले आहे. असे शेवटी शिंदे यांनी म्हंटले आहे.