कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : शहराच्या कोपरगाव बेट भागातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या व प्रति त्र्यंबकेश्वर समजल्या जाणा-या कचेश्वर देवस्थानची श्रावणी सोमवारनिमीत्त स्वच्छता करण्यात आली. येथे नेहमीच भाविकांची दर्शनांसाठी गर्दी होत असते. बेट भागातील जगदंबा आर्युवेदीकचे वैद्य अभिजित पंडोरे यांनी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून देत आपले देवस्थान आपली जबाबदारी याअंतर्गत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
कचेश्वर मंदिराचे पुजारी व माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश सचिव रमेश क्षीरसागर म्हणाले की, निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताई, विसोबा खेचर, संत नामदेव हे सर्व तीर्थयात्रा करताना त्र्यंबकेश्वर, नाशिक येथून पुणतांबा कोपरगाव बेट भागात आले होते. त्यांनी कोपरगाव बेट भागात मुक्काम केल्याचा उल्लेख नामदेव गाथेत आहे, कचेश्वरी केलेला नमस्कार त्र्यंबकेश्वरी पोहोचतो अशी अख्यायिका आहे. त्यामुळे कचेश्वर देवस्थानास विशेष महत्व आहे.
श्रावणात भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी सातत्याने परिश्रम घेतले जातात. वैद्य अभिजित पंडोरे यांनी त्यांचे वडीलांच्या स्मरणार्थ स्वातंत्रदिनी मोफत शंभर झाडांचे वितरण करून वृक्षारोपण काळाची गरज असल्याची माहिती दिली. कचेश्वर देवस्थान स्वच्छता अभियानात अनिकेत शिंदे, रोहित रूईकर, ओम पंडोरे यांच्यासह परिसरातील भाविकांनी विशेष मदत केली.