तरुणांनी युवादिनी कोपरगावचा नावलौकीक वाढवावा – अविनाश भारती

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : तेजस्वी, तपस्वी आणि तत्परता या गुणांचा मिलाफ म्हणजेच तरुण होय, स्वतःवर विश्वास ठेवुन आयूष्यात जिददीने मोठे होण्यांचा संकल्प करून कोपरगावच नांव प्रत्येक क्षेत्रात देशात उज्वल करा तोच खरा युवादिन असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादुत, प्रसिध्द व्याख्याते कवी हभप अविनाश भारती यांनी केले. संजीवनी युवा प्रतिष्ठानने आठ वर्षात युवा, पर्यावरण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक कार्यात उभे केलेले काम सर्वांनाच प्रेरणादायी आहे असेही ते म्हणाले.

             जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन येथील कलश मंगल कार्यालयात गुरुवारी रक्तदान शिबीर व विविध क्षेत्रात नांवलौकीक मिळविणा-या तरूण तरुणी उद्योजकांचा सत्कार राजमाता जिजाउ भोसले, स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका सौ निता पाटील यांनी रक्तदानाबद्दल माहिती दिली.

           प्रारंभी श्री. गायकवाड सर यांनी प्रास्तविकात संजीवनी युवा प्रतिष्ठानने आठ वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामांची चित्रफितीसह माहिती दिली. राजमाता जिजाउ, स्वामी विवेकानंद व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे यावेळी पुजन करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते वसुधा दारूवाला (रांगोळी). अशोक बो-हाडे (वैकुंठ रथसेवा), आदिनाथ ढाकणे (नदी स्वच्छता), मधुकर टेके (साई आनंद ग्रुप), सुशांत घोडके (स्वच्छता), दिपक वराडे (ड्रॅगन शेती), रोहित काले (कालांश), जगन्नाथ वाणी (हातमाग), रविंद्र आबक (सेंद्रीय शेती), रोहित दवंगे (उद्योजक), तौफिक शेख (आरोग्य), संदिप जाधव, भानुदास बैरागी (कला), प्रसाद संवत्सरकर, सौरभ संवत्सरकर, सचिन संवत्सरकर, अतुल संवत्सरकर (जीवदान), किरण सिनगर, काकासाहेब बोर्डे (पोहणे, जीवदान), मयुर रणशिंग (क्रीडा), दुर्वा आव्हाड (क्रीडा) यांचा त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबददल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

  भारती पुढे म्हणाले की, आपण वयाच्या चौदाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट वक्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत होवुन आजवरचा प्रवास सुरू ठेवला आहे. माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी अनेकवेळा त्यांच्या भाषणातून कोपरगांवचे राजकारण राज्याचे राजकारण फिरवत असते अशी टिपणी करून येथील नेतृत्वात असलेल्या विशेष कार्यशैलीचा गुणगौरव केला. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी युवकासाठी आठ वर्षांपासून सुरू केलेले संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्य राज्याला उदबोधक आहे, नव्हे तर चिखलात रूतलेल्या कलागुणांना प्रेरणा देणारे आहे. 

          आज समाजात प्रतिमा बनविणे अवघड होवुन बसले आहे. माणसाचं हीत ज्यात आहे ते गीत युवकांच्या ओठावर सदैव असले पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी सर्वप्रथम शेतक-यांची कर्जमुक्ती करून सामाजिक जाणीवतेचे दर्शन घडविले. त्यांनी कृषी क्षेत्राला महत्व देवुन अभंगातुन प्रबोधन केले. ग्रामगितेतुन तरूणांनी गावाला तीर्थक्षेत्र बनवावे, स्वतःचे ध्येय निश्चित करून ते आत्मसात करण्यांसाठी नियोजन करावे. आयूष्यातील किंमती वेळ निघून गेल्यावर पश्चातापाची वेळ तरुणाईवर येणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे असेही ते म्हणाले. शेवटी सिध्दार्थ साठे यांनी आभार मानले.