दोन आरोपी ४ ट्रॅक्टरसह ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरु
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणारी टोळी कोपरगाव ग्रामीण पोलीसांनी जेरबंद केली असुन ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांसह चार ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आल्याची माहीती. विभागीय पोलिस उपाधिक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, २३ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तमराव चरमळ यांच्या मालकीचा एक लाल रंगाचा छोटा ट्रॅक्टर घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. तसेच याच दरम्यान कोळपेवाडी येथील महेंद्र कोळपे यांचा एक ट्रॅक्टर चोरल्याची तक्रार देण्यात आली होती. यावरून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवली.
गोपनीय माहीतीनुसार संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मंगेश सुदाम वर्पे व अतुल सखाराम घुले रा. संगमनेर हे दोघे कमी दराने ट्रॅक्टर विक्री करत असल्याची माहीती मिळाली यावरुन पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस कर्मचारी इरफान शेख, अशोक शिंदे, कृष्णा कु-हे, यांच्या पथकाने संगमनेर येथे जावून मिळालेल्या माहीतीच्या अधारे ट्रॅक्टर विक्री करणाऱ्या चोरांचा शोध घेवून मंगेश वर्पे व अतुल घुले या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता. तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चोरी केली असुन त्यापैकी चार ट्रॅक्टर जवळ असल्याचे सांगितले तर या कामी इतर चौघांचा सामावेश असल्याचे पोलीसांनी उघड केल्याने १२ लाखाचे चार ट्रॅक्टर सह दोघांना ताब्यात घेतले असुन इतर चार आरोपींचा शोध सुरु आहे. या ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीमध्ये एका अल्पवयीन चोराचाही सामावेश असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
दरम्यान चोरलेले ट्रॅक्टर हे फायनान्स कंपनीचे आहे असे सांगून चोरटे कमी किमतीत ट्रॅक्टर इतरांना विना कागदपञ विकत असल्याचे तपासात उघड झाल्याने या टोळीने अहमदनगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरुन विकल्याचे उघड होत असल्याने या टोळीने आत्तापर्यंत किती चोऱ्या केल्या याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच त्यांच्या इतर साथीदारांच्या शोधात पोलीस रवाना झाले आहेत.