कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ९ ऑगस्टला क्रांतीदिनापासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत ३० ऑगस्टपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या अभियानात तसेच ‘हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा’ उपक्रमात शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, भाजप, भाजयुमो व भाजपअंतर्गत विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहललता कोल्हे यांनी केले आहे.
स्नेहललता कोल्हे म्हणाल्या, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी व शूरवीर क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचे अमृतक्षण अनुभवतो आहोत. या सर्वांची आठवण म्हणून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या मातीविषयी, देशाविषयी प्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान जागवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ म्हणजेच ‘माझी माती, माझा देश’ अभियान देशभर राबविण्याची घोषणा केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील वर्षभरात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अभियान राबवण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा समारोप आपण ‘माझी माती, माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने करत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे तसेच प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम होणार आहे.
या अभियानांतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायत, शहर व तालुका स्तरावर दर्शनी व महत्त्वाच्या ठिकाणी शीलाफलकाची उभारणी व लोकार्पण, पंचप्राण प्रतिज्ञा व सेल्फी काढणे, मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्या वीरांना नमन, वसुधा वंदन, स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायन, मिट्टी यात्रांचे आयोजन करून आपल्या परिसरातील माती संकलित करणे, ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर आपल्या परिसरातील जलस्त्रोतांच्या आसपास स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या व वीरांच्या नावाचा फलक उभारून पुष्पहार अर्पण करणे व वंदन करणे, शीलाफलकाचे समर्पण, मूठभर माती हातात घेऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करून देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याची पंचप्राण शपथ घेतानाचे सेल्फी फोटो घेऊन ते वेबसाईटवर अपलोड करणे.
वसुधा वंदन’ अंतर्गत प्रत्येक गावात ७५ देशी झाडांची लागवड करणे, अमृत वाटिका तयार करणे, ‘वीरोंको को वंदन’ अंतर्गत हृदयत असलेले व नसलेले स्वातंत्र्यसैनिक, सैन्यदलातील जवान, निवृत्त पोलिस कर्मचारी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे, ध्वजवंदन व राष्ट्रगीत गायन आदी उपक्रम या अभियानादरम्यान राबवायचे आहेत. शहरी भागात शीलाफलकाची उभारणी, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्यसैनिकांना व वीरांना वंदन, ध्वजारोहण, राष्ट्रगीत गायन हे पाचही कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत.
या अभियानांतर्गत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर प्रत्येक गाव, शहरात ‘मिट्टी यात्रा’ काढून मूठभर माती सन्मानाने सुशोभित कलशात गोळा करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातून प्रत्येक गावातील माती गोळा करून हे अमृत कलश दिल्ली येथे कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष सोहळ्यासाठी सन्मानाने पाठविण्यात येणार आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी देशभर ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला होता. यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सर्व भाजप बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व अन्य संस्था व नागरिकांनी घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा तसेच ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन स्नेहललता कोल्हे यांनी केले आहे.