घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाची सांगता करा- मुख्याधिकारी गोसावी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : देशाचा स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाची सांगता १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून करावे असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कोपरगावच्या नागरीकांना केले आहे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हर घर तिरंगा फडकावून मोठ्या उत्साहात साजरा केल्याने संपुर्ण शहर तिरंगा ध्वाजाने  व्यापुन गेलं होतं त्याच प्रमाणे आता अमृतमहोत्सवाची सांगता प्रत्येक घरावर तिरंगा फडकावावा नागरीकांना तिरंगा ध्वज उपलब्ध व्हावा म्हणुन पालिकेच्यावतीने शहरांतील विविध तीन ठिकाणी ध्वज विक्रीचे स्टाॅल लावण्यात आले आहेत.

सरासरी ५ हजार ध्वजाचे उद्दीष्ट असुन नाममात्र दराने तिरंगा ध्वज उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्यावर्षी ११ हजार २०० तिरंगा ध्वज शहरात दिले होते. त्यामुळे गेल्या वर्षाचा तिरंगा अनेकांनी जपून ठेवले असल्याने यावर्षी हर घर तिरंगा मोहिमेत कमी ध्वज लागणार आहेत. कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सांगता म्हणून अमृत वाटिकाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील एम. के. आढाव विद्यालयाच्या प्रांगणात  ७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या कोपरगावच्या वीर भूमिपुत्रांच्या स्मृतींना कायम उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी पालिकेच्यावतीने शिलाफलक तयार करण्यात आला असुन शिलाफलकाचे लोकार्पण १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे शिलाफलक एम. के. आढाव विद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात येणार असल्याने  देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानाप्रती मानवंदना देण्याची व्यवस्था पालिकेच्यावतीने केल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.