कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव तालुक्यातील पाच वीर जवानांनी आपल्या देशाचे रक्षण करत वीरमरण पत्करले. या शुरवीरांची आठवण सर्वांना कायम स्मरणात राहावी. या शुध्द हेतूने साईसेवा भक्त मंडळाच्यावतीने वीर माता, वीर पिता व वीर पत्नींचा सन्मान म्हणुन गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
देशाचे स्वातंत्र अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तालुक्यातील शहीद पुत्रांच्या वीरमाता, वीरपत्नी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील शेकडो नागरीक, शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थीनींसह महाविद्यालयाची तरुणाईने सज्ज होवून ही देशभक्तीची गौरव रॅली काढण्यात आली.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका सामान्य नागरीकाप्रमाणे या गौरव रॅलीत सामील होवून हातात फलक घेवून वीर माता, वीर पत्नीवर पुष्पवृष्टी करीत होत्या यावेळी वीर जवानांच्या पत्नी, मातेला आठवणीने अश्रु अनावर झाले आणि स्नेहलता कोल्हे यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या अश्रुंना वाट मोकळी केली. स्नेहलता कोल्हे यांनी तितक्याच आस्थेने त्यांचे सांत्वन केले.
साई सेवा भक्त मंडळ व कोपरगाव वासीयांच्या वतीने वीरमाता व वीरपत्नी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कोपरगावच्या इतिहासात प्रथमच अशी गौरव रॅली काढल्याने नागरीकांचा सहभाग लक्षणीय होता. भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान या घोषणांनी रॅलीसह परिसर दुमदुमून गेला. हजारो विद्यार्थी, नागरिक उस्फुर्तपणे यात सहभागी झाले. चौका चौकात गौरव रॅलीचे पुष्पवृष्टी करुन स्वागत करीत वीर जवानांना मानवंदना दिली जात होती.
तालुक्यातील शहीद सुभेदार सुनील वलटे (दहेगाव), हवालदार अमोल जाधव (मुर्शतपूर), हवालदार दीपक कृष्णा आहेर (कोळपेवाडी), नायक पुंजाहारी भालेराव (ओगदी), बाळू पगारे (भोजडे) यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. तर सजवलेल्या रथात वीर जवानांचे माता पिता, पत्नी, मुलं, भाऊ यांना फेटा बांधुन मिरवणुक काढण्यात आली.
तिरंगा झेंडा, फुलांची सजावट केलेल्या रथावर वीरमाता व वीरपत्नी स्थानापन्न झाल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून निघालेल्या रॅलीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तहसिलदार संदीपकुमार भोसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख सुधाकर मलिक, माजी नगराध्यक्ष रविंद्र फाटक, संजय जगताप, डॉ. विलास आचार्य, सतिश गुजराती, फकीर कुरेशी, विनायक गायकवाड, बाळासाहेब जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या तालुक्यातील व गावातील वीर जवानांची ओळख बहुतांश शिक्षकांना व विद्यार्थांना माहीत नसल्याने त्यांची ओळख करण्याबरोबर देशाप्रती बलीदान देणाऱ्यांचा गौरव व्हावा. या शुध्द हेतूने साईसेवा भक्त मंडळाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवून ही अराजकीय वीर जवानांना मानवंदना देण्यासाठी गौरव रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.
मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व साई सेवा भक्त मंडळाचे ५० पेक्षा अधिक कार्यकर्ते यांचा मुख्य सहभाग होता. विविध जाती धर्मातील बांधवांनी गौरव रॅलीवर पुष्पवृष्टी करुन शहीद जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी आत्मा मालिक शैक्षणिक संकुल, संजीवनी सैनिक स्कूल, के.बी.पी विद्यालय, विधी महाविद्यालय, सेवा निकेतन, एम. के. आढाव विद्यालय, सी.एम. मेहता कन्या शाळा, शारदा स्कूल, चक्रधर, महर्षी स्कूल, उर्दू स्कूल, एस.जे.एस, के.जे. सोमैय्या महाविद्यालय आदिसह विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहुन या गौरव रॅलीत सहभागी झाले होते. तहसिलदार भोसले यांनी यावेळी उपस्थितांना राष्ट्ररक्षण व प्रगतीची शपथ दिली.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शहीद दीपक आहेर यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी व शहीद सुनील वलटे यांच्या शेतात जाण्यासाठी शासनाने रस्ता करून द्याव्या अशी मागणी यावेळी केली. सूत्रसंचालन सुरेश गोऱ्हे यांनी केले. आभार माजी सैनिक शांताराम होन यांनी मानले. साई सेवा भक्त मंडळाचे सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विषेश परिश्रम घेतले.