कोपरगाव मतदारसंघासाठी साडेपाचशे कोटीहून अधिक निधीची तरतूद

स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिर्डी विमानतळावर नवे सुसज्ज प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी ५२७ कोटी तर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी २५.५० कोटी अशा एकूण साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. याबद्दल भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी कर्जत (जि. अहमदनगर) दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी फडणवीस यांचा सत्कार करून मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले. 

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयावर आधारित आणि सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर,कामगार, महिला, उद्योजक, युवक अशा समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे.

फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबविण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसह राज्य सरकारतर्फे आणखी सहा हजार रुपये देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार असून, आता शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ६ हजार असे एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा लाभ १ कोटी १५ शेतकरी कुटुंबांना होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीकविमा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.

या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी २५.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चास-वडगाव-बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) रा.मा. ६५ (कोपरगाव ते धारणगाव रस्ता), रा. मा.०७ धामोरी, येसगाव रस्ता (प्र.जि.मा.०४) येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (४ कोटी), बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८), (मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता), रा.मा.६५ अंजनापूर ते रांजणगाव देशमुख रस्ता, उक्कडगाव रस्ता रा.मा.६५ (करंजी फाटा ते कॅनॉलपर्यंत रस्ता) मध्ये सुधारणा, रा.म.मा.५० (रा.मा.३६) शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा, रामपूर वाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा ८७) मध्ये सुधारणा, रा.मा. ७ रस्ता (प्रजिमा ८५) सा. क्र.०/५०० मध्ये कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी या अर्थसंकल्पात २५.५० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून आता मतदारसंघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने गेल्या काही वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ असून, या ठिकाणी दररोज देश-विदेशातून असंख्य साईभक्त येत असतात. शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आलेले असून, या विमानतळावर नवीन अद्ययावत प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी ५२७ कोटीचा निधी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव मतदारसंघाला ही अनोखी भेट दिली असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.

राज्यातील गतिमान शिंदे-फडणवीस सरकारने शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी अशा समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी अनेक योजना जाहीर करून त्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून, 

मुलगी जन्मास आल्यानंतर तिच्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या रकमेत भरघोस वाढ केली आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट, शिक्षण सेवकांच्या व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे. जलसंवर्धन मोहिमेला गती देण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात येणार असून, आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण,शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देण्यात येणार असून, सरकार या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार महाकृषी विकास अभियान राबविणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी आगामी तीन वर्षात ३० टक्के वीज वाहिन्यांचे सौरउर्जेत रुपांतर करण्यात येणार असून, पंतप्रधान कुसुम योजनेतून पुढील वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात येणार आहेत. वीरशैव लिंगायत समाजासाठी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जाहीर करून भरीव निधी मंजूर केला आहे, सर्व समाज घटकांना पुढे घेऊन जाण्याचे काम हे गतिमान सरकार करते आहे, राज्यासह केंद्र सरकारचेही मोठे पाठबळ विकासासाठी मिळत आहे असे सौ. स्नेहलताताई कोल्हे  म्हणाल्या.