बौद्ध विहारात स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील निवारा भागातील धम्मदीप बौद्ध विहारमध्ये माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी (१४ एप्रिल) गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. असे सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत, कृतिशील नेते होते. अज्ञानात खितपत पडलेल्या उपेक्षित, शोषित, वंचित लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मोलाचा महामंत्र देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून दुर्बल, वंचित, उपेक्षित लोकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. अस्पृश्यता व जाती व्यवस्था निर्मूलन, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्याबरोबरच स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. मानवता धर्म हाच खरा धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, माणुसकी जपावी, हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उद्धारासाठी फार मोठे कार्य केले आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचला. भारतासारख्या सर्वधर्मीय देशाला एका माळेत ओवण्याचे अद्वितीय कार्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून केले. आपण कितीही वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होऊन प्रणाम केला तरी ते कमीच ठरणार आहे, एवढे अनंत उपकार त्यांनी आपल्या देशावर केले आहेत, असे गौरवोद्गार स्नेहलताताई कोल्हे यांनी काढले.

प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. स्नेहलताताई कोल्हे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, विजय आढाव, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, संदीप देवकर, वैभव आढाव, अल्ताफभाई कुरेशी, दीपक जपे, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, पप्पू दिवेकर, विजय भातनकर, दिलीप दुशिंग, नानासाहेब जगताप, विलास विघे, कचरू ठोंबरे, शंकर सोनपसारे, माता रमाई महिला मंडळाच्या सरूबाई दुशिंग, हिराबाई कोपरे, ताराबाई पगारे, छायाताई जाधव, मंदाताई जगताप, शालिनीताई जगताप, सुरेखाताई भातनकर, शोभाताई दुशिंग आदी उपस्थित होते.