कोल्हे-थोरात यांच्या सहकार्याने गणेश कारखान्याचा पेट्रोल पंप पूर्ववत सुरू -सुधीर लहारे

राहाता प्रतिनिधी, दि. २२ : लुक्यातील गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर कारखान्याच्या वतीने चालविण्यात येणारा पेट्रोल पंप मागील काही दिवसांपासून बंद होता. कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा गणेश कारखान्याचे मार्गदर्शक विवेक कोल्हे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा पेट्रोल पंप पूर्ववत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती गणेश साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष सुधीर लहारे यांनी दिली.

शिर्डी-गणेशनगर-शनी शिंगणापूर रस्त्यावर गणेश साखर कारखान्याच्या कार्यस्थळाजवळ गणेश सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोल पंप असून, तो कारखान्याच्या वतीने चालविण्यात येतो. निवडणूक प्रक्रिया व इतर काही कारणांमुळे दरम्यानच्या काळात २६ जून २०२३ ते १९ जुलै २०२३ पर्यंत हा पेट्रोल पंप बंद होता. कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळास हा पेट्रोल पंप सुरू करण्यास सांगितले होते; परंतु यामध्ये निधीची उपलब्धता व इतर काही समस्या होत्या. त्याबाबत नवनिर्वाचित संचालक मंडळाने विवेक कोल्हे यांना माहिती देऊन या समस्या सोडविण्याची विनंती केली.

त्यावर विवेक कोल्हे यांनी संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सर्व अडचणी सोडविल्या. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर बुधवारी (१९ जुलै) गणेश कारखान्याचे नूतन अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व पूजा करून हा पेट्रोल पंप पूर्ववत सुरू करून ग्राहकांच्या सेवेत दाखल झाला आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधरराव चौधरी, गणेश कारखान्याचे संचालक बाबासाहेब डांगे, अनिल गाढवे, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, मधुकर सातव, आलेश कापसे, अनिल टिळेकर, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन भोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

गणेश कारखान्याच्या निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व दृष्टे विवेक कोल्हे यांनी काळाची पावले ओळखून आधुनिक तंत्रज्ञान वापरून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात रासायनिक उपपदार्थ, पॅरासिटामॉल औषध निर्मिती व इतर अनेक प्रकल्प सुरू करून ते यशस्वी केले आहेत.

गणेश कारखाना चांगल्या रीतीने चालावा यासाठी ते प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने त्यांनी गणेश कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे. विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्याचा पेट्रोल पंप पूर्ववत चालू करावा, अशी सूचना नूतन संचालक मंडळास केली होती. त्यांच्या सूचनेवरून संचालक मंडळाने पेट्रोल पंप पूर्ववत सुरू केला आहे, असे गणेश कारखान्याचे नूतन अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी सांगितले.