कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नासिक येथे, आत्मा मालिक संकुलाच्या नामांकित योजनेखाली शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 49, राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 203 विद्यार्थ्यांचा आदिवासी विभागाचे प्रभारी आयुक्त तथा अपर आयुक्त तुषार माळी, अपर आयुक्त संदीप गोलाईत तसेच सहआयुक्त संतोष ठुबे व आयुक्त कार्यालयाच्या सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी आदिवासी विकास आयुक्त तथा अपर आयुक्त तुषार माळी म्हणाले की, राज्यातील आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे व समाजातील इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांना शिक्षणाबरोबरच सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य ’ यांनी नामांकित शाळेतून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकारने इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेतून विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आत्मा मालिक शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शाळेचे राष्ट्रीय स्तरावर खेळलेले 49 विद्यार्थी, राज्यस्तरावर खेळलेले 203 विद्यार्थी त्याचबरोबर चित्रकला विभागामध्ये इंटरमिजिएटवर इलेमेंटरी परीक्षेमध्ये राज्य मेरिट लिस्ट मध्ये आलेले पाच विद्यार्थी, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आलेले आठ विद्यार्थी आहेत.
आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काटकपणा, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, त्याचबरोबर चिकाटी हे गुण असल्यामुळे व त्यांना योग्य संधी मिळाल्या तर ते विद्यार्थी समाजातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या पेक्षाही चांगली कामगिरी करू शकतात. हे आत्मा मालिक ने या विद्यार्थ्यांच्या वर केलेल्या कष्टातून दिसून येत आहे. यावेळी त्यांनी आत्मा मालिक प्रशासन व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अपर आयुक्त संदिप गोलाईत यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श प्रस्थापित होईल व इतर विद्यार्थ्यांनाही त्यामुळे प्रोत्साहन मिळेल त्यामुळेच ज्या आदिवासी विभागाच्या मुळे या विद्यार्थ्यांना संधी मिळाली त्या विद्यार्थ्यांचा सत्कार या आदिवासी विभाग कार्यालयासमोर होणे व हे कार्यालय विद्यार्थ्यांना पहावयास मिळणे यासाठी खास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे उद्गार याप्रसंगी काढले.
सहआयुक्त संतोष ठुबे यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर एकलव्य विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांचा माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते गुणगौरव करण्याबाबतचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण होते. सकाळीच विद्यार्थी आत्मा मालिक च्या शैक्षणिक संकुलाच्या कोकमठाण च्या प्रांगणातून सात बस द्वारे आदिवासी विभागाच्या कार्यालयासमोर पोहोच झाले होते त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह व सत्काराच्या निमित्ताने औसुक्य होते.
खेलो इंडियाच्या राष्ट्रीय पोस्टरवर झळकणारी आत्मा मालिक ची विद्यार्थिनी, कुमारी भोई आपल्या मनोगतात म्हटली की, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक, क्रिडा व्यवस्थापक साईनाथ वर्पे व प्राचार्य माणिक जाधव यांच्या सह सदर उत्साह वाढवणारा कार्यक्रम आयोजित केल्या मुळे भविष्यात आम्हाला आणखी गुणवत्ता दाखवण्यासाठी बळ मिळेल या कार्यक्रमामुळे आमचा उत्साह वाढला असून निश्चितच आम्ही भविष्यात आणखी उज्वल यश संपादन करू असे मत व्यक्त केले.
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलासह आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी व विश्वस्त मोहन शेलार याप्रसंगी उपस्थित होते. त्यांनी आदिवासी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.