उमेद ग्रंथालय हा प्रकल्प शिक्षण प्रक्रियेला गती देणारा, व अनुकरणीय – डॉ. सुरेश पाटेकर

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : पदाला न्याय देणा-या व्यक्तींची समाजाला खरी गरज असते. शिक्षक आणि लोकसहभागातून बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.शंकर गाडेकर यांनी अवघ्या आठ महिन्यात उभारलेला सर्वांसाठी उमेद ग्रंथालय हा उपक्रम वाचन चळवळीची उमेद वृद्धींगत करणारा आहे. हा प्रकल्प शिक्षण प्रक्रियेला गती देणारा, व अनुकरणीय असा प्रकल्प आहे. असे गौरवोद्गार शेवगाव पंचायत समितीचे प्रभारी गटिवकास अधिकारी डॉ. सुरेश पाटेकर यानी काढले.

बोधेगाव येथे शिक्षक व लोकसहभागातून सुमारे पाचश ते सहाशे पुस्तके संकलीत करून सुरू करण्यात आलेल्या सर्वासाठी उमेद ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक भोसले व पाटेकर यांच्या हस्ते फित कापून उमेद ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. या वेळी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, डॉ. अरूण भिसे, केंद्रप्रमुख सुरेंद्र गि-हे, काळू भांगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  

गटशिक्षणाधिकारी कोलते म्हणाल्या, नेहमी चागंली पुस्तके वाचावीत. ज्ञानसंपन्न होऊन चांगल्या विचाराने आचरण केले तर जीवनातील संकटांना आपण सहजपणे सामोरे जातो. समाजासाठी काही तरी करता येते. मोबाईलचा अतिरेक थोडा कमी करून पुस्तके वाचावीत, त्यासाठी विद्यार्थ्यांना, वाचकांना प्रेरीत करावे, असे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन पुनम राऊत यांनी केले. आभार अमोल कांबळे यांनी मानले.