शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची वाटप सुरू – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : पिक विमा कंपनीला अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून पिक विमा धारक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे अग्रीम पिक विमा रक्कम वाटपास प्रारंभ झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ४५,०६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून एकूण ६४,०२३ शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज दाखल केलेले होते. विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या उत्पन्नामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त घट झाल्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी राज्य व्यवस्थापक, ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला शेतकऱ्यांना अग्रीम पिक विम्याची रक्कम देण्याचे आदेश देवून त्याबाबत अधिसूचना देखील प्रसिद्ध केली होती.

त्याबाबत तातडीने सुनावणी घ्यावी. अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे, कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून याबाबत नुकतीच सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीसाठी कृषी विभागाचे प्रभारी राज्य सचिव, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित हे उपस्थित होते. यावेळी झालेल्या सुनावणीत कृषी विभागाचे प्रभारी राज्य सचिव यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला झालेल्या नुकसानी बाबत पिक विमा धारक शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्या सूचनेनुसार कोपरगाव मतदार संघातील पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना बाजरी, मका, तुर, भुईमुग, सोयाबीन, कापूस, कांदा या सर्व पिकांचा अग्रीम पिक विमा देण्यात येणार असून प्रथम सोयाबीन पिकाचा अग्रीम पिक विमा वाटपास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ऐन दिवाळीच्या सणाला अग्रीम पिक विमा रक्कम वाटपास प्रारंभ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. अनेक सोयाबीन पिक विमा धारक शेतकऱ्यांचे आधार लिंक नसून त्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.