देर्डे चांदवड येथे स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : गोरगरीब लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्यातील महायुती सरकारने यंदाही दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. (१० नोव्हेंबर) कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून, गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्याचा राज्य सरकारचा उपक्रम स्वागतार्ह आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी केले. स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी देर्डे चांदवड येथे लक्ष्मीमाता मंदिरात आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून लक्ष्मीमातेचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी श्रीक्षेत्र गाणगापूर येथील प्रशांत शास्त्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले, विठ्ठल कोल्हे, डॉ. नानासाहेब होन, बाळासाहेब कोल्हे, बाळासाहेब होन, राणुजी कोल्हे, पुंजाहरी आरगडे, पोपट होन, संगीता जगताप आदींसह ग्रामस्थ, भाविक-भक्त, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते राज्य सरकारच्या १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला सक्षम, कणखर व दूरदर्शी नेतृत्व लाभले असून, मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत सेवा, सुशासन व गरीब कल्याण यावर भर देत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या त्रिसूत्रीचा अवलंब करत सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

मोदी यांनी आपल्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सर्वसामान्य, गरीब, वंचित, दिव्यांग यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. ते देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत आहेत. पंतप्रधान मोदी हे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून त्यांच्यापर्यंत विविध विकास योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली असून, पायाभूत सोयी-सुविधांबरोबर विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी देशातच कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करून देशवासियांचे प्राण वाचवले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनतेला मोफत अन्नधान्य पुरवठा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुतीचे सरकार काम करत असून, त्यांचा गरीब कल्याणाचा वारसा पुढे चालवत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीला शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.

त्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीत मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर व खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र, या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. हा आनंदाचा शिधा जनसामान्यांच्या सुखाचा शिधा आहे. रेशनकार्डधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. आपण आमदार असताना देर्डे चांदवड व परिसरात अनेक विकास कामे केली असून, यापुढील काळातही या भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.