भारदे स्मृतीदिना निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बुधवार दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय फिरता करंडक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती पद्मभूषण बाळासाहेब भारदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमेश भारदे, सचिव हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. इ. चौथी ते सहावी प्रेमळ नाते आजी आजोबांचे, मिशन चांद्रयान – ३, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, माझे आवडते समाजसुधारक व मी नदी बोलतेय हे विषय असून सातवी ते नववी या मोठ्या गटासाठी मला माणूस व्हायचंय, शिक्षण व्यवस्थेकडून माझी अपेक्षा, स्वामी विवेकानंद एक विचारधारा, संत नामदेव लोकलही अन् ग्लोबलही व कृत्रिम बुद्धिमत्ता माझे मत (A. I.)  असे विषय आहेत.

दोन्ही गटातून प्रथम क्रमांक प्राप्त संघाला कै. बाळासाहेब भारदे स्मृती फिरता करंडक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. गटनिहाय विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी २० नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संयोजक निलेश मोरे (9404100178 ),एकनाथ टाके (94234 67908 )यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.