शेवगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ : पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून लौकीक असलेले, शेवगाव मुंबई पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत जवळचा आहे. आर्थिक दृष्ट्या किफाईतशीर ठरणारा असल्याने, बहुतेक लोक शॉर्टकट म्हणून या मार्गाचा वापर करतात.

तसेच जालना, अंबड, औरंगाबाद, शेंद्रे पंचतारांकित एमआयडीसी मधून मुंबई – पुणेकडे जाणारी जड वाहतूकीसाठी देखील सोयीस्कर म्हणून याच मार्गाचा उपयोग होत असल्याने, तसेच शेवगाव जवळ असलेल्या ज्ञानेश्वर, केदारेश्वर, वृद्धेश्वर व गंगामाई हे साखर कारखाने आणि परिसरात असलेल्या अनेक जिनिंग प्रेसिंग व तेल गिरण्यामुळे येथे असंख्य वाहनांची वर्दळ असते.

शेवगावातून जाणाऱ्या नाशिक – परळ, औरंगाबाद – बारामती, घोटी – बीड, आदि राज्य मार्गावर वरचेवर वाहतूक कोंडी होत असते. एखाद्या वाहनाच्या किरकोळ खोळंब्यामुळे त्या मागील, समोरील आणि बाजूची सर्व वाहतूक ठप्प होते. सर्व बाजूच्या रस्त्यावर शेकडो वाहनाच्या रांगा लागतात. असे झाले की, किमान एक दीड तास ती सुरळीत होत नाही. हे आता नित्याचे झाले आहे.

यावर बायपासचा पर्याय आहे. मात्र निवडणूक आली की, सर्वजण तो विषय गांभीर्याने आपल्या अजंठ्यावर घेण्या-पलीकडे त्यांची धाव जात नाही. त्याचा पाठपुरावा निवडणूक संपल्यानंतर होत नाही. असा अनुभव आहे. या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडी पेक्षाही शेवगाव शहरातील बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर आहे.

बाजारपेठेतील मुख्य रस्ता अत्यंत आवश्यक अरुंद असून, दोन्ही बाजूचे व्यावसायिक आपल्या मालाचे बाहेरील बाजूस टेबल, रॅक मांडून प्रदर्शन करीत थेट रस्त्यावर येतात. येणारा ग्राहक त्याच्यापुढे आपली दुचाकी उभी करून दुकानात जातो. दोन्ही बाजूचे व्यावसायिक व ग्राहक ही अशाच पद्धतीने व्यवहार करत असल्याने, या रस्त्यावर पादचाऱ्यासाठी जागाच शिल्लक रहात नाही. त्यातून धडधाकट माणसालाही चालणे मुश्कील होते.

शाळकरी मुले, महिला, वृद्ध यांना तर या मार्गावरून नीट चालताच येत नाही. अशावेळी मोकाट, मोकाट जनावरांचा घोळका, डुकरांची पिलावळ मध्ये घुसली तर अपघात झाल्याशिवाय राहात नाही. त्याकरता व्यवसायिकांनी प्रदर्शन टाळावे, ग्राहकांनी वाहने पेठेत नेऊ नये, किमान एवढे पथ्य पाळले तर अपघात टाळता येतील.

तसेच राज्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आगामी काळात शेवगावची संभाव्य वाढ विचारात घेऊन बारामती औरंगाबाद राज्य मार्गावरुनर भगूर गावाच्या पुढे दोन्ही बाजूस बायपास रस्ते काढून, डाव्या बाजूचा बायपासर रस्ता नेवासे नाशिक रस्त्याला जोहरापूरच्या ढोरा नदी जवळ जोडावा तर उजव्या बाजूचा बायपास बीड रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळ जोडावा, तेथून तोच बाय पास औरंगाबाद बारामती राज्य मार्गाला तळणीच्या माथ्यावर जोडून तेथून तो नाशिक मार्गाला ढोरा नदीजवळ निघणाऱ्या बारामती औरंगाबाद बायपास रस्यास जोडला तर या चारही मार्गावर होणारी थेट वाहतूक शेवगाव शहरात न घुसता बाहेरून होऊ शकते व वाहतूक कोंडी व अपघात होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.