कोपरगावचे रेल्वेस्टेशन आता अद्यावत होणार

नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन कामाचा शुभारंभ 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ हजार कोटींच्या कामास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करून, एका नव्या पर्वाची सुरुवात केली. या योजनेंतर्गत कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या पुर्नार्विकास कामासाठी तब्बल २९ कोटी ९४ लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याचाही शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे आता कोपरगाव रेल्वे स्टेशनचा कायापालट होवून हे स्टेशन अद्यावत देखील होईल. यामुळे प्रवाशांना अत्यधुनिक सोईसुविधा उपलब्ध होणार आहे.

रेल्वे स्टेशनच्या कामाचा शुभारंभ सोहळ्याला कोपरगाव येथील कार्यक्रमाला खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास ठोळे, विठ्ठलराव लंघे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, महिला आघाडीप्रमुख विमल पुंडे, कोपरगाव रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक बी.एस. प्रसाद आदींसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, घाटमाथ्यावरचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी वळवले तर ११५ टीएमसी पाणीसाठा वाढेल. विविध ठिकाणी बंधारे बांधले तर संपूर्ण नगर जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटेल व पिण्यास सिंचनासाठी मुकबल पाणी मिळेल. निळवंडेची लढाई आपण जिंकलेली आहे. पुढची लढाई घाट माथ्याचे पाणी गोदावरी लाभक्षेत्रात आणायचे आहे. त्या पाण्याचा सर्वाधिक लाभ कोपरगाव तालुक्यासह परिसराला होणार आहे. ते काम आपण पूर्णत्वास नेऊ, त्यासाठी आपणास जनांदोलन करण्याची देखील तयारी ठेवावी लागेल. असेही ते म्हणाले.

आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव रेल्वे स्टेशनला ऐतिहासिक महत्व आहे. नव्या आराखड्यात त्या इतिहासाची जपणुक करावी. विमान तळासारखी अद्यावत विद्युत व्यवस्था करावी. पोलीस यंञणा पुरेशी वाढवावी. माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विमानतळाची निर्मिती होवून, दुष्काळी भागाचा विकास झाला. कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून, या कामाला गती देणे गरजेचे आहे. या रेल्वे मार्गामुळे संपूर्ण दक्षिण भारत कोपरगावला जोडला जावून मतदार संघाचा अधिकचा विकास होणार आहे. या कामाला गती द्यावी. अमृत भारत योजनेअंतर्गत कोपरगावच्या अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

माजी आमदार स्नेहललता कोल्हे म्हणाल्या, घाटमाथ्यावरचे पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळवण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हे यांनी सतत पाठपुरावा केला. त्या कामाला गती मिळाली पाहिजे. सन २००५ साली झालेला समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा जर रद्द करता आला तरच खऱ्या अर्थाने आपलं हक्काचं पाणी वाचणार आहे. यासाठी आता सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न केला पाहिजे. ‘जल है तो कल है’ रेल्वेस्थानकावर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा कोल्हे परिवाराने केला.

कोपरगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या या रेल्वे स्टेशनमुळे या भागाच्या विकासाला मदत होणार आहे. रेल्वे स्टेशनला निधी मिळवण्यासाठी भेलेही मी किंवा खासदार, आमदार यांनी पञव्यवहार केला, हे एक निमित्त आहे. परंतु रेल्वे मंञी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषेश दखल घेतल्यामुळे रेल्वे स्टेशनची समस्या दुर केली. त्या बद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करीत, पंतप्रधान मोदी यांनी या देश जनहीताचे विकास कार्य केल्याचे कौतुक कोल्हे यांनी करुन त्यांचे आभार मानले. शिंगणापूर जिल्हा परिषद शाळा व संजीवनी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व समूह नृत्य सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन उपस्थित सर्वांना देशातील विकासाची घोडदौड विदेशातील देशांपेक्षा गतिमान चालु आहे. देशाचा विकास दर कसा उंचावतो, हे सांगत असताना उपस्थित सर्व नेते कार्यकर्ते नागरिक मग्न होवून ऐकत होते.