कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. २ म्हणजे निवारा हाउसिंग सोसायटी, सुभद्रा नगर, कोजागिरी कॉलनी, जानकी विश्व, रिद्धी – सिद्धी नगर, आढाव वस्ती येवला रोड, ओम नगर या वसाहतींसाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यामधून १ कोटी १० लाखाचा निधी जिल्हास्तरीय दलितेतर मधून विविध कामांसाठी मंजूर झाल्या असल्याची माहिती या भागाचे माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली.
हा निधी मिळण्यासाठी समता परिवाराचे मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहेत.
या निधी अंतर्गत जानकी विश्व मधील संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण, त्याचप्रमाणे सुभद्रा नगर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचे पेव्हिंग ब्लॉक बसवणे. तसेच निवारा हाउसिंग सोसायटी परिसरातील भांडगे घर ते संजीवनी जनरल स्टोअर्स या रस्त्याचे डांबरीकरण, येवला रोड येथे स्वामी रंग अपार्टमेंट ते सरोदे घर या रस्त्याचे डांबरीकरण, त्याचप्रमाणे कांगोणे घर ते निवारा ट्रेडर्स पर्यंत भुयारी गटार या योजनेचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. २ हा सर्वात जास्त विकास कामे झालेला प्रभाग आहे. याचे सर्व श्रेय या परिसराचे कार्यक्षम नगरसेवक जनार्दन कदम यांना असल्याचे निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष व निवारा हाऊसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेंद्र व्यास यांनी सांगितले. प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला निधी मंजूर करून आणल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
या परिसरामधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण किंवा पेव्हींग ब्लॉक बसवण्याचे काम गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास आलेले असून या भागातील सर्व रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व भागातील भुयारी गटार योजनेचे काम झालेले आहेत. एवढेच नव्हे तर या परिसरातील सर्व रिकाम्या परिसरात वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत परीसरातील नागरिकांना सुविधा देण्यात येत आहे. महादेव मंदिर, हनुमान मंदिर, देवीचे मंदिर अशा विविध मंदिरांनी धार्मिक वातावरण फुललेले असते.
त्याचप्रमाणे इतर भागातील रिकाम्या जागेतही पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. मुलांना खेळण्यासाठी भव्य बगीचा, खेळांची साधने व जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या ओपन स्पेस ला कंपाउंड वॉल घालण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ओपन जिम सुद्धा ओपन स्पेस मध्ये तयार करण्यात आलेली आहे. या भागातील एकाही ओपन स्पेस वर अतिक्रमण झालेले नाही, ही बाब सुद्धा उल्लेखनीय आहे.
गणेश स्टेज नावाचे ४० × २५ असे मोठ्या आकाराचे व्यासपीठ बांधले गेलेले आहेत. या व्यासपीठावर सातत्याने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. पुढील भागात गुळाचे प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल हरलाल जोशी यांच्या देणगीतून भव्य स्वरूपाचे शेड उभारण्यात आलेले आहे. माजी नगराध्यक्षा व निवारा भजनी मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या माध्यमातून स्व.काशीबाई दादाप्पा कोयटे यांच्या देणगीतून साकार झालेल्या महादेव मंदिरात केवळ याच परिसरातील नव्हे, तर सुभद्रा नगर, जानकी विश्व, रिद्धी सिद्धी नगर, कोजागिरी कॉलनी, साई सिटी, आढाव वस्ती, येवला रोड, भामानगर, खडकी या भागातील विशेषतः महिला वर्ग धार्मिक विधीसाठी रोज येत असतो.
त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ह.भ.प. बाबा कापे यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर काकड आरतीचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न होत असतो. तसेच सप्तशृंगी मंदिरात ही नवरात्र उत्सवात हजारो महिला एकत्र येऊन मनसोक्त आनंद घेत असतात. स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय करण्यात आली आहे. खडकी व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो मुले या शाळेत येऊन शिक्षण घेत असतात.
काका कोयटे यांच्या पुढाकारातून १९८१ साली स्थापन झालेल्या या वसाहतीमध्ये सर्व सुजाण नागरिक अतिशय आनंदाने व गुण्या – गोविंदाने नांदतात. त्याचप्रमाणे सामाजिक, धार्मिक कामे सुद्धा या परिसरामध्ये काका कोयटे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नेहमीच चालू असतात.