कोपरगाव मध्ये जाधव पाटील इंडस्ट्रीत लागली आग, कच्चा माल जळून खाक

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८:  शहरालगत असलेल्या शिंगणापूर हद्दीतील कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीमधील जाधव पाटील इंडस्ट्री या प्लास्टिक मटेरिअलच्या कंपनीला शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना नुकतीच घडली असून यामध्ये तीन लाखांचा कच्चा माल जळून खाक झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अभिजित जयवंतराव जाधव यांची प्लॉट नंबर १३ मध्ये प्लास्टिक पॉलिमर आणि ठिबक सिंचन निर्मिती करण्याची कंपनी असून या कंपनीच्या मागील बाजूस कच्चा माल असून त्याच ठिकाणी अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली असून यामध्ये ५ टन कच्चा माल, पाण्याच्या मोटार, पाईप अशा अनेक वस्तू जळून खाक झाल्या असून अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जयवंत जाधव यांनी दिली.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कंपनीच्या मागील बाजूस महावितरण कंपनीच्या तार गेलेल्या असून तारांच्या शॉट सर्किट मुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या ठिकाणी तात्काळ संजीवनी त अग्निशामक दलाला पाचारण केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश मिळाले आहे.

यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. जर वेळेत अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली नसती तर शेजारच्या इतर कारखान्यांनाही आगीचा फटका बसला असता.