शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालया समोर शेवगाव-नगर रस्त्यावर आयशर टेम्पो व स्कूटरच्या झालेल्या अपघातात येथील ज्येष्ठ विधिज्ञ विजयराव (उर्फ पोपटराव ) जगन्नाथ काकडे (वय ७५ ) यांचे जागेवर निधन झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजता झाला. ॲड. काकडे यांच्या अपघाती निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात झाल्यानंतर ॲड. काकडे यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. तालुक्यात त्यांचे नातेवाईक व चाहता वर्ग मोठा असल्याने अनेकांनी लगेच शेवगावची वाट धरली.
शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर रात्री ७ वाजता अत्यंत शोकाकूल वातावरणात शेवगाव अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. काकडे अतिशय शांत, संयमी आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते.
त्यांच्यामागे औरंगाबाद खंडपिठात व शेवगाव न्यायालयात त्यांचा यशश्वी वारसा चालवित असलेले ॲड. युवराज आणि ॲड. अभिजित काकडे ही दोन विधिज्ञ मुले, एक विवाहित मुलगी, पत्नी, सुना, जावई , नातवंडे, नगर येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुभाष व ॲड. शिवाजीराव काकडे हे बंधू असा मोठा परिवार आहे.