शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळावी असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केला असून यासंदर्भात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी (दि.२४ ) शेवगावी आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी काल मंगळवारी (दि २०) शेवगाव येथे तालुक्यातील भाजप व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याने भाजपाच्या राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात भाजपातील ही धुसफुस दबक्या आवाजात सुरु होती. आता ती या निमित्ताने चव्हाट्यावर आली. पक्षश्रेष्ठी यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आमदार मोनिकाताई राजळे दोन टर्मपासून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, परंतु भाजपचे जे मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याचा मुंडे समर्थकाचा दावा आहे.
विकास कामे करतानाही भेदभाव केला जातो मूळ निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून वैयक्तिक राजळे यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या तालुकाध्यक्ष पद निवडी बाबतही असेच झाले, त्यामुळे वरिष्ठ पातळीपर्यंत दाद मागून निष्ठावान भाजप कार्यकर्ते तुषार वैद्य यांची निवड करण्यास भाग पाडले.
लोकसभा निवडणुकीत आमदार राजळे यांचे कट्टर समर्थकांच्या गावातून भाजप उमेदवार डॉ.सुजय विखे यांना कमी मते मिळाली त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील आ.राजळे व त्यांच्या समर्थकांची भूमिका ही संशयास्पद वाटते. असा दावा करून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास येथे भाजप उमेदवाराचा पराभव होण्याची दाट शक्यता असल्याने भाकरी फिरवावी व शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अरुण मुंडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी नियोजनाच्या बैठकीत करण्यात आली.
बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन शेळके, तालुका चिटणीस बाळासाहेब डोंगरे, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, तालुका सरचिटणीस गुरुनाथ माळवदे, विलास फाटके, संजू टाकळकर, विनोद मोहीते , नगरसेवक अजय भारस्कर, विकास फलके, शब्बीर शेख, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, अर्जुन ढाकणे, शाम कनगरे, पप्पू केदार आदींनी केली. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले आहे.