संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकताच चार दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न झाला. यात इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या सुमारे ३०० क्रीडापटूंनी सहभाग नोंदवुन त्यांच्यातील क्रीडा कौशल्याचे शानदार प्रदर्शन  केले.

तसेच कोपरगांव तालुका व अहमदनगर जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारांमध्येही येथिल विध्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करून या संस्थेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळालाही महत्व असल्याचे सिध्द केले, अशी  माहिती सैनिकी स्कूलने प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे हे संजीवनी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातुन सर्वगुण संपन्न व देशप्रेमी पिढी घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवितात.

याच अनुषंगाने ने चार दिवसीय क्रीडा महोत्सव भरविण्यात आला होता. यात विध्यार्थ्यांनी कबड्डी, खो खो, व्हालीबॉल, फुटबॉल, धावणे, गोळा फेक, भाला फेक, जलतरण, अशा  एकुण २१ सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवुन उत्तम खेळाचे प्रदर्शन  केले. सुमित कोल्हे यांचे हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य कैलास दरेकर, वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर, क्रीडा शिक्षक, पी. आर. तडवी, आदि उपस्थित होते.

तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये देखिल वेगवेगळ्या वयोगटात बॉक्सिंग स्पर्धेत गणेश कांगणे, अनिकेत धोंडगे, अमित मते, पारस राजवळे यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली तर रितेश घोरपडे, गौरव कापे, पृथ्वीराज पंजाबी, साईराज सावंत, सार्थक मढवई व यश  बुधर यांनी रौप्य पदकाची कमाई केली. याच स्पर्धेत आयुश हेगडमल व पियुष मते यांनी अनुक्रमे १०० मी धावणे व भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली.

तालुका स्तरीय स्पर्धेत सत्यम मगर, आयुष हेगडमल व रोहन गांगुर्डे यांनी अनुक्रमे ३००० मी, १०० मी व ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदके मिळविली. तसेच पियुश  मते याने भाला फेक मध्ये तर कमलेश  कावडे व प्रणव रोहकले यांनी अनुक्रमे ४०० मी व  १०० मी धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदके मिळविली. याच स्पर्धेत कमलेश  कवडे, क्षितिज सुर्यवंशी, अजिंक्य पगारे व मयुर घायतडकर यांनी रिले रेसमध्ये सुवर्ण पदक मिळविले.    

     संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व जिल्हा स्तरीय स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना पुणे येथे होणाऱ्या  विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.