एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तनाची मागणी मान्य – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून शासनाला दरवर्षी जवळपास १० कोटीचा महसूल मिळतो मात्र त्या बदल्यात चाऱ्या दुरुस्तीसाठी अतिशय तुटपुंजा निधी मिळतो. या निधीतून चाऱ्यांची पूर्णत: दुरुस्ती होत नसल्यामुळे सिंचनाच्या वेळी अडचणी निर्माण होवून लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी नागपूर येथे पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली.

त्या मागणीला  पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

नागपूर येथे विधानभवनात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक गुरुवार (दि.२२) रोजी पार पडली. या बैठकीस आ. आशुतोष काळे यांच्या बरोबरच आ. दिलीपराव बनकर, आ. माणिकराव कोकाटे, आ. लहू कानडे, कार्यकारी अभियंता सा. ज्ञा. शिंदे आदी या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जास्तीच्या निधीची मागणी केली. त्याचबरोबर यावर्षी धरण क्षेत्रात मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे रब्बीचे एक व उन्हाळी तीन आवर्तन असे चार आवर्तन द्या अशी मागणी केली. त्या मागणीची दखल घेवून पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक रब्बी व तीन उन्हाळी असे चार आवर्तन देण्यात येईल असे जाहीर करून चार आवर्तन देण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन करावे अशा सूचना उपस्थित पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या.   

आ. आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रातच घेतली जावी यासाठी आग्रह धरून बैठक लाभक्षेत्रात होत नसल्यामुळे लाभधारक शेतकरी व पाणी वापर संस्थांना आवर्तना सबंधी आपल्या अडचणी मांडता येत नाही याकडे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले. त्याला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा देवून लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी यांची समन्वय बैठक घेणार असल्याचे सांगितले.

गोदावरी कालव्यांवर अनेक ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरु असून हि कामे पाटबंधारे विभागाने तातडीने पूर्ण करून घ्यावी जेणेकरून आवर्तन सुरु असतांना शेतकऱ्यांना अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी व कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे आवर्तन काळात अडचणी येतात त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी या आ. आशुतोष काळे यांच्या मागणीला देखील पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.