साकरवाडी येथील सोमैया विद्या मंदिरमध्ये रोबोटिक्सचे प्रशिक्षण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : रोबोटिक्स हा आता केवळ भविष्याचा सिद्धांत राहिलेला नाही, तर तो सध्याच्या आपल्या वास्तवाचा एक भाग बनलेला आहे. विविध उद्योगांमध्ये त्याच्या विविध उपयोगांव्यतिरिक्त, रोबोटिक्स हे एक नाविन्यपूर्ण शिक्षण साधन आहे जे अधिकाधिक लक्षणीय होत चालले आहे.

रोबोटिक्स शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते तसेच विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल वातावरण तयार करू शकते ज्यामुळे STEM पद्धतीचे शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांना सहज सोपे होते. हाच उत्तम विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी तसेच सोमैया ट्रस्ट चे माजी अध्यक्ष स्व.डॉ. शांतीलाल करमशी सोमैया यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांची पुनरावृत्ती करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील  साकरवाडी वारी येथील सोमैया विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोमैया विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत असलेल्या के. जे. सोमैया इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि, मुंबई यांच्यातर्फे १५ व १६ डिसेंबर रोजी दोन दिवशीय कार्यशाळा भरवून रोबोटिक्सचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्व.डॉ. शांतीलाल सोमैया यांच्या विचारांच्या नुसार प्रत्येक खाजगी क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची मुख्य जबाबदारी हि एक मजबूत आणि अधिक समावेशक समाज निर्माण करण्याच्या दिशेने काम करणे हि असणे होय. त्यांचे हे समाज सुधारक विचार शालेय शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने हि रोबोटिक्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती असे या कार्यशाळेच्या मार्गदर्शिका डॉ. वैशाली वाढे यांनी सांगितले. रोबोटिक्सचे प्रात्यक्षिके देण्यासाठी मुबंईच्या के. जे. सोमैया आय. टी. कॉलेज मधील आकाश अध्यापक, आर्या भाईक, पार्थ कछडिया, जय मानेक आणि रुद्र गोपाणी या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

२१ व्या शतकात मुलांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची ओळख व्हावी ज्यामुळे ते मोठे झाल्यावर कोणत्याही अडचणीशिवाय संगणक आणि इतर आयटी उपकरणे वापरू शकतात. कोडिंग आणि रोबोटिक्सच्या जगात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील करिअरचा पाया रचण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शालेय जीवनातच तंत्रज्ञानाची ओळख होणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून हे प्रशिक्षण देत असल्याचे डॉ वैशाली वाढे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध तंत्रध्यान व प्रशिक्षण देण्यास सोमैया ट्रस्ट व साखरवाडी येथील सोमैया विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय सतत प्रयत्नशील असते. ही कार्यशाळा घेण्यास के. जे. सोमैया आय. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश उकरंडे, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनीता पारे, गोदावरी बायोरिफायनरीज लि. साखरवाडीचे संचालक, सुहास गोडगे, बी.एम.पालवे, यांचे प्रोत्साहन मिळाले.