चिन्ह वाटप होताच झाली प्रचाराला सुरुवात

शेवगाव प्रतिनिधी, दि . २६ : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ७८ तर ग्रामपंचायत सदस्यांच्या ९४ प्रभागातील २४३ जागांसाठी ५७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत असल्याचे बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी स्पष्ट झाले. यापैकी कर्हेटाकळी ग्रामपंचायतीच्या ६, शेकटे खुर्दच्या ४ तर एरंडगाव भागवत व मुंगी येथे प्रत्येकी १ अशा चार ग्रामपंचायतीच्या एकूण १२ सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.

तालुक्यातील ढोरसडे आंत्रे, शहर टाकळी, देवटाकळी, खरडगाव येथे सरपंच पदासाठी सर्वात जास्त प्रत्येकी ५ तर, मुंगी व वरूर बुद्रुक येथे प्रत्येकी ४ उमेदवार सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यात सरपंच पदासाठी बहुतेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले.

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १७३ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एक हजार ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्जाच्या छाननीत सरपंच पदाचे ३ तर ग्रामपंचायत सदस्य पदाचे १५ अर्ज अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सरपंच पदाच्या ९२ तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या ४३६ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता सरपंच पदासाठी ७८ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५७३ उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

बुधवारी उशीरा चिन्ह वाटप होताच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. गुप्त बैठका अर्थ पूर्ण तडजोडीस वेग आला आहे. या ग्रामपंचायत निवडणुका मधूनच विधान सभेच्या निवडणुकीचा कौल ठरणार असल्याने प्रमुख राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून असून प्रसंगी साम, दाम, दंड भेद अवलंबून आपल्या कार्यकर्त्याला रसद पुरवत असल्याचे आढळते.

बऱ्हाणपूर, सामनगाव, भागवत एरंडगाव, लाखेफळ, थाटे, दिवटे भगूर, मडके, खडके, हिंगणगावने, समसूद, एरंडगाव व शेकटे खुर्द येथे सरपंच पदासाठी  दुरंगी तर आव्हाने बुद्रुक, लोळेगाव, वडुले बुद्रुक, लाडजळगाव, गोळेगाव, बालमटाकळी, बोधेगाव, कर्हेटाकळी वडूले खुर्द येथे तिरंगी सामना होत आहे. मुंगी व वरूर बुद्रुक येथे सरपंच पदासाठी चौरंगी सामना होत आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी बोधेगाव येथे सहा प्रभागातील १७ जागांसाठी सर्वात जास्त ५४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

खरडगाव येथे चार प्रभागातील अकरा जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्हेटाकळी ग्रामपंचायतच्या ३ प्रभागातील ३ जागांसाठी ८ उमेदवार मैदानात आहेत. ग्रामपंचायत निहाय सदस्य पदांच्या उमेदवारांची संख्या सरपंचपदाच्या उमेदवारी अर्जांची संख्या कंसात पुढील प्रमाणे – आव्हाने बुद्रुक २४ (३), बराणपुर १४ (२), सामनगाव १४ (२), लोळेगाव १४ (३), वडुले बुद्रुक १८(३), एरंडगाव भागवत १७ (२), लाखेफळ १४(२), थाटे १४(२), लाड जळगाव ३८(३), दिवटे १४ (२), मुंगी ३३(४), वरुर बुद्रुक २२ (४).

याशिवाय रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोट निवडणुकीसाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कऱ्हेटाकळी ग्रामपंचायतचे बिनविरोध सदस्य पुढील प्रमाणे ओम प्रकाश ससाने, सरताज शेख, कविता लेंडाळ, सुनिता दाभाडे, मोईन सय्यद, शैला राठोड.