खासगी शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी स्पर्धेत पुढे  – राजेश कदम

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६: खासगी शाळा प्रमाणेच किंबहूना काकणभर अधिक जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रातील स्पर्धेमध्ये चमकून आपली गुणवता सिद्ध करतात. ही वस्तुस्थिती असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी येथे केले. तालुक्यातील सालवडगावातील जिल्हा परिषदेच्या भापकर वस्ती शाळेमध्ये ज्ञानरचनावादी डायनिंग हॉलचे उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी राजेश कदम बोलत होते.

जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. याचाच प्रत्यय या शाळेमध्ये आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती तागडे यांनी भापकर वस्ती शाळा सर्वगुणसंपन्न केल्याचे पहायला मिळाले. शाळेची विद्यार्थीनी शुभ्रा म्हस्के हिने शाळेतील परसबाग याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिके दाखविली.

नायब तहसीलदार राहुल गुरव, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, विस्तार अधिकारी सचिन भाकरे, सालवडगाव सरपंच अण्णासाहेब रुईकर, उपसरपंच यमुनाबाई भापकर, मुख्याध्यापिका आरती तागडे, श्रीकांता शिंदे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जया भापकर ,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले, शिक्षक बँक संचालक रमेश गोरे, विषय तज्ञ मधुकर घुले, लक्ष्मण गायकवाड, केंद प्रमुख बबन ढाकणे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.