कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : कोपरगाव तालुक्यातील धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे या पाच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून, त्यामुळे या योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
स्नेहलता कोल्हे यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी धारणगाव येथे भेट देऊन धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावांसाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत २९ कोटी ६२ लाख रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यांनी गावातील विकास कामे व विविध समस्यांबाबत ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांसोबत चर्चा केली.
यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दगुराव चौधरी, संचालक रमेश घोडेराव, दीपक चौधरी, सरपंच करुणा, उपसरपंच गणेश थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी शेखर मेटकरी, जयंती सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शंकर, संदीप चव्हाण, रमाकांत वाकचौरे, संपत वहाडणे, सोपान वहाडणे, दीपक सुरे, अंबादास देवकर, संदीप चौधरी, दीपक वाघ आदींसह धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी, चांदगव्हाण येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर जल’ असा नारा देत देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ‘जलजीवन मिशन’ नावाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लागले आहे. कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती.
ही समस्या सोडविण्यासाठी आपण विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात मतदारसंघातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधींचा निधी मंजूर करवून आणला. त्यातून अनेक गावातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या असून, तहानलेल्या नागरिकांची तहान भागविल्याचे व पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याचे मला मोठे समाधान आहे.
धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी, चांदगव्हाण या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. ही समस्या सोडविण्यासाठी आपण माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडे सतत पाठपुरावा करून या पाच गावासाठी संयुक्त प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली. या योजनेच्या कामासंदर्भातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व आपण स्वत: स्थानिक तसेच अहमदनगर व नासिक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांबरोबर वारंवार बैठका घेतल्या.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत ही पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २९ कोटी ६२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर धारणगावसह पाच गावातील नागरिकांना नियमित स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होणार असून, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी या योजनेतील तलाव, पाईपलाईन, जलकुंभ व इतर कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार होण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी लक्ष द्यावे. या योजनेसंदर्भात काही अडचणी आल्या तर त्या दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसेच विकासाचे प्रश्न सोडविण्यास सतत प्राधान्य दिले आहे.
सत्ता असो वा नसो, कोल्हे कुटुंबीय जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत काम करत आहे. कोल्हे यांनी सरकारदरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, या योजनेचे काम कोल्हे यांच्यामुळे पूर्णत्वास जात असल्याने आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, असे दीपक चौधरी यांनी सांगितले.