सृष्टी निर्मितीची स्त्रीला मिळालेली दैवी देणगी – राजश्री मालेगावकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : स्त्रीच्या मासिक पाळीतूनच गर्भधारणा होऊन सृष्टी उभी राहू शकते. असे असतानाही मासिक पाळीला प्रॉब्लेम, अडचण, विटाळ असे शब्द वापरले जातात. ही शब्द योजनाच मासिक पाळीविषयीचा दूषित दृष्टिकोन दाखविणारी आहे. खरे तर, स्त्रीला मिळालेली सृष्टी निर्मितीची शक्ती व त्यासाठी आवश्यक मासिक पाळी म्हणजे स्त्रीला नवनिर्मितीची मिळालेली दैवी देणगीच आहे” असे प्रतिपादन सम्राट फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि सोशल अवेअरनेस मिशनच्या राजश्री मालेगावकर यांनी केले.

          येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये नुकताच ‘महिला कल्याण व  स्त्री सबलीकरण’ आणि ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ द्वारे आयोजित ‘महिला आरोग्य  जागृती’ कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी मालेगावकर बोलत होत्या. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, महिलांची तडजोडवादी वृत्तीच त्यांना स्वतःकडे दुर्लक्ष करायला शिकविते. परिणामी महिला वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात.

सध्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक असून अशा आजारांची लागण महिलांमध्ये विषाणूंमधून होते. त्यात सॅनिटरी पॅडच्या वापराचा मोठा भाग असतो. त्यामुळे या पॅडचा वापर करण्याबाबतची जाणीव जागृती स्त्रियांमध्ये होणे अतिशय गरजेचे आहे. प्रात्यक्षिकासह पॅड व त्यामधील प्लास्टिकचे दुष्परिणाम त्यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.

त्याचबरोबर ऑरगॅनिक पॅडचे वेगळेपण दर्शवून हे पॅड स्त्रियांनी वापरणे आरोग्य व पर्यावरणदृष्ट्या देखील कसे हितकारक आहे, हे दाखवून दिले. प्रश्नोत्तराच्या सत्रात मालेगावकर यांनी विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत मासिक पाळी व  त्यामधील विविध बाबींसंबंधाने  विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करत आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी, “आरोग्य हीच व्यक्तीची, देशाची धनसंपदा असून, व्यक्तिगत स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची सवय ही संपत्ती वाढविण्यात  महत्त्वाची भूमिका बजावते. आरोग्याचा प्रारंभिक संबंध जसा स्वच्छतेशी,तसा स्वच्छतेचा संबंध संस्कृतीशी आहे. त्यामुळे आपण कुठे व किती स्वच्छता ठेवतो? त्या संबंधाने कशी वर्तणूक करतो? यावरून आपली संस्कृती ठरते.” असे सांगून त्यांनी माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाची आठवण करून दिली. या अभियानात सहभागी होत स्वच्छता राखणे व इतरांना स्वच्छतेची सवय लावणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकातून समिती प्रमुख डॉ. उज्ज्वला भोर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतानाच महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष व त्याविषयीचा हलगर्जीपणा याविषयी माहिती दिली . या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक म्हणून डॉ. सीमा चव्हाण यांनी भूमिका बजावली तर प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी उपस्थितांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाला सोशल अवेअरनेस मिशनच्या सुपरवायझर तनुजा गायकवाड, डॉ.रंजना वर्दे, रोहिणी डीबरे, डॉ.योगिता भिलोरे, अश्विनी पाटोळे, प्रा.बागुल  यांसह महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक, महाविद्यालयातील महिला कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.