पाहिल्या टप्यात बारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाहिल्या टप्यात झालेल्या बारा ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच पदाच्या निवडी आज झाल्या. यात बारा पैकी १० पंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या.  फक्त दोन ठिकाणी उपसरपंच पदासाठी उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.

यावेळी जनतेतून झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत १२ पैकी दहा ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच निवडून आल्या तर आज पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत १२ पैकी सहा ग्रामपंचायतीत महिला उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या निवडणुकीवरून आता महिला गावकीच्या राजकारणात सक्रीय झाल्याचे अधोरेखित झाले.

       अमरापूर ग्रामपंचायतीत भाजपाच्या महिला तालुका अध्यक्षा आशाताई गरड यांनी सरपंचपदासह सदस्यपदी अशा दोन्ही ठिकाणी चांगल्या मतांनी विजय मिळविला. त्यांनी निकालानंतर लगेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उर्वरित ९ सदस्य दोन गटाचे असल्याने येथे उपसरपंचपदासाठी दुरंगी लढत झाली. त्यात गणेश बोरुडे विजयी झाले.

त्यांना सहा मते मिळाली तर विरोधी उमेदवार समीर रफिक शेख यांना चार मते मिळाली. एक मत बाद झाले. सरपंच आशाताई गरड यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीसाठी सहा. गटविकास अधिकारी दिप्ती गाठ निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नवले यांनी कामकाज पाहिले.

        आखेगाव ग्रामपंचायतीत देखील दूरंगी लढत झाली. अशोक बन्सी गोरडे हे उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना सहा मते मिळाली विरोधी उमेदवार घन:शाम विठ्ठल पायघन  यांना तीन मते मिळाली तर तीन सदस्य गैरहजर राहिले.       

अन्य दहा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. ग्रामपंचायत निहाय उपसरपंच पदी बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे-
खामगाव- सुभाष यादव बडधे, रावतळेकर कुरुडगाव- वर्षा नितीन भराट, रांजणी- सौ अंजना संभाजी वाल्लेकर,
जोहरापूर- आशाताई बाबासाहेब उगलमुगले, दहिगावने -राजाभाऊ पाऊलबुद्धे. येथे पाऊलबुध्दे हे सलग तिसऱ्यांदा बिनविरोध उपसरपंच झाले आहेत.

खानापूर – तात्यासाहेब बाप्पासाहेब थोरात, भायगाव- आशाबाई एकनाथ लांडे, सुलतानपूर खुर्द – मच्छिंद्र एकनाथ डोईफोडे,
प्रभू वडगाव – मुक्ताबाई कचरू बटुळे, वाघोली- राज्यात माझी वसुंधरा अभियानात दीड कोटीचे प्रथम पारितोषिक मिळविलेल्या वाघोली ग्रामपंचायतीमध्ये भाजपाच्या सरपंच सुस्मिता उमेश भालसिंग यांनी जनतेतून बाजी मारली. त्यांच्याच अध्यक्षतेखाली कांताबाई बबन बोरुडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. तर महिला ग्रामविकास अधिकारी जनाबाई फटाले यांनी निवडीचे कामकाज पाहिले आहे. यामुळे वाघोलीतील महिलाराजची तालुक्यात चर्चा रंगली आहे.